Kalyan Crime: शौचालयाच्या बांधकामावरून वाद, तरुणावर तलवारीने क्रूर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:02 IST2025-06-02T13:54:05+5:302025-06-02T14:02:17+5:30
Man Attacked With Sword In Kalyan: कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे रविवारी (०१ जून २०२४) धक्कादायक घटना घडली.

Kalyan Crime: शौचालयाच्या बांधकामावरून वाद, तरुणावर तलवारीने क्रूर हल्ला
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे रविवारी (०१ जून २०२४) धक्कादायक घटना घडली. शौचालयाच्या बांधकामावरून पेटलेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर आली. याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विक्रांत जाधव या २४ वर्षीय तरुणावर शेजाऱ्याने तलवारीने क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात विक्रांत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रांतच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, शेजारच्या गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मुलावर तलवारीने हल्ला केला.
खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या (बीएनएस) कलम ११८ (धोकादायक शस्त्रांनी दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
दोन्ही कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे वाद सुरू
मालमत्तेच्या मुद्द्यांवरून दोन्ही कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे वाद सुरू असल्याचे वृत्त आहे. घराशेजारील शौचालयाच्या बांधकामावरून गायकवाड कुटुंबांनी जाधव कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार विक्रांतच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली, अशी माहिती आहे.