KDMC चा संतापजनक कारभार! इमारतीतील १० जणांच्या चुकीच्या शिक्षा १०२ सदस्यांना दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 21:05 IST2026-03-23T21:05:53+5:302026-03-23T21:05:53+5:30
केडीएमसीने सर्वेादय सागर इमारतीचा पाणी पुरवठा केला खंडीत, केडीएमसीच्या कारवाई विरोधात रहिवासी संतप्त

KDMC चा संतापजनक कारभार! इमारतीतील १० जणांच्या चुकीच्या शिक्षा १०२ सदस्यांना दिली
मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण डोंबिली महापालिकेने मालमत्ता कराची वसूली जोरात सुरु केली आहे. कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सागर या इमारतीमधील ११२ सदनिकाधारकांपैकी १० जणांनी मालमत्ता कर भरलेला नाही. त्याची शिक्षा १०२ सदनिकाधारकांना बसली आहे. महापालिकेच्या क प्रभाग कार्यालयाने इमारतीचा पाणी पुरवठाच खंडीत केला आहे. महापालिकेच्या या सक्तीच्या कारवाई विरोधात इमारतीमधील रहिवासीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिकेच्या या अजब कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.
इमारीतमधील रहिवासी अशरफ शेख यांनी सांगितले की, महापालिकेने मालमत्ता कराच्या वसूलीसाठी ही कारवाई केली आहे. मात्र ९० टक्के रहिवासियांनी त्यांचा मालमत्ता कर भरला आहे. १० टक्के रहिवासियांनी मालमत्ता कर भरलेला नाही. त्याची शिक्षा ९० टक्के रहिवासियांना का ? असा संतप्त सवाल रहिवासियांचा आहे. महापालिकेने इमारतीचा पाणी पुरवठा बंद करताना इमारतीमधील रहिवासियांना कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाही. ही कारवाई करताना महापालिकेचे अधिकारी त्यांच्यावर दादागिरी करुन त्यांना धमकावित होत असा आरोप करण्यात आला आहे.
सलग सार्वजनिक सुट्ट्या लागून आल्याने बँका बंद होत्या, त्यामुळे काही रहिवाशांना तत्काळ कर भरणे शक्य नव्हते. तरीही अधिकाऱ्यांनी कोणतीही मुभा न देता पाणीपुरवठा बंद केला. रहिवासियांनी सांगितले की, आम्ही नियमित लाखो रुपयांचा कर भरताे. तरी आम्हाला कर चुकविणारे अशी वागणी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हा प्रकार आम्हीसहन करणार नाही. पाणी पुरवठा खंडीत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा रहिवासियांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.