केडीएमसी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३८२ जणांचा मृत्यू, तिसऱ्या लाटेची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:39 AM2021-05-11T08:39:21+5:302021-05-11T08:47:27+5:30

कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यावेळी मनपा हद्दीत दिवसाला ३०० ते ४५० रुग्ण आढळत होते.

KDMC: 382 killed in second wave of corona, fear of third wave | केडीएमसी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३८२ जणांचा मृत्यू, तिसऱ्या लाटेची भीती

केडीएमसी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३८२ जणांचा मृत्यू, तिसऱ्या लाटेची भीती

googlenewsNext

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघ्या दोन महिने १० दिवसांत ३८२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही लाट १५ मे नंतर ओसरणार असली तरी पुन्हा जुलै, ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.

कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यावेळी मनपा हद्दीत दिवसाला ३०० ते ४५० रुग्ण आढळत होते. मृत्यूचे प्रमाण आटोक्यात होते. जुलै २०२० मध्ये एका दिवसात ६६४ रुग्ण आढळले होते. दिवाळीनंतर रुग्णसंख्या घटू लागली होती. जानेवारीत पहिली लाट ओसरल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, १७ फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज एक ते दोन हजारांच्या संख्येने रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची उपलब्धता, पुरवठ्याच्या ऑडिटसाठी पथके नेमली गेली. मात्र, मागणी आणि पुरवठा यात तफावत होती. त्यामुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले.

प्रशासनाची तयारी सुरू 
- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे विभा कंपनीच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोविड रुग्णालयात ५० टक्के बेड मुलांसाठी आरक्षित ठेवले जाणार आहेत, तसेच मुलांसाठी आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे.
- रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी एक याप्रमाणे दोन बालरोगतज्ज्ञ आहेत; परंतु प्रत्येक रुग्णालयास प्रत्येकी दोन असे चार बालरोगतज्ज्ञ भरती केले जाणार आहेत. दोन्ही रुग्णालयांत १० बेड मुलांसाठी असतील.
 

Web Title: KDMC: 382 killed in second wave of corona, fear of third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.