चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश: तिघांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:21 IST2025-09-09T18:21:00+5:302025-09-09T18:21:16+5:30

डोंबिवली पोलिस ठाण्याची कारवाई

Inter-state chain snatching gang busted: Three arrested | चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश: तिघांना ठोकल्या बेड्या

चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश: तिघांना ठोकल्या बेड्या

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेेटवर्क
डोंबिवली: एकिकडे सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असताना अशा गुन्हयातील आंतरराज्य टोळीचा डोंबिवली पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्हयातील तीन आरोपींना बेडया ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरलेल्या सोनसाखळींसह गावठी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे आणि एक दुचाकी असा तीन लाख ८० हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

३ सप्टेंबरला दुपारी साडेचारच्या सुमारास ठाकुर्ली ९० फुटी रोडवरील चामुंडा सोसायटी गेट जवळून एक वृद्ध महिला जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरटयांनी तीच्या गळयातील सोन्याचा ऐवज खेचून ते पळून गेल्याची घटना घडली होती. या गुन्हयाच्या तपासकामी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, डोंबिवली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अच्युत मुपडे आणि पोलिस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण, पोलिस हवालदार सुनिल भणगे, मंगेश शिर्के, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, नितीन सांगळे, राजेंद्र सोनवणे, देविदास पोटे, ज्ञानेश्वर शिंदे आदिंची दोन पथके नेमली होती.

अभय सुनिल गुप्ता (वय २१) अभिषेक ओमप्रकाश जौहरी ( वय ३२) आणि अर्पीत उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला ( वय २७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मुळचे उत्तरप्रदेशमधील कुमारनटोला, हरीहरगंज आणि खमरीया इथले रहिवाशी आहेत.

१०६ सीसीटिव्ही तपासले
गुन्हयाच्या तपासकामी पोलिसांनी तब्बल १०६ सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. चोरांनी गुन्हा करताना दुचाकी वापरल्याचे यामध्ये निष्पन्न झाले. दुचाकीच्या नंबरवरून संबंधित मालकाला संपर्क केला असता दुचाकी चोरीला गेल्याची माहिती त्याच्याकडून पोलिसांना मिळाली.

पुण्यात दुचाकी चोरली

आणि डोंबिवलीत सोनसाखळी चोरी
गुन्हयात वापरलेली दुचाकी २२ ऑगस्टला पुण्यातील नारायण पेठेतून चोरली होती. याप्रकरणी दुचाकी मालकाने स्थानिक विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. चोरटयांनी दुचाकीचा वापर डोंबिवलीत सोनसाखळी चोरण्यासाठी केला. दरम्यान चोरटे डोंबिवली पुर्वेकडील सुनिल नगरमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तिघा आरोपींना सापळा लावून अटक करण्यात आली.

पिस्तुल, काडतुसे आढळली

पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता अभय गुप्ता आणि अभिषेक जौहरी यांच्याकडे गावठी पिस्तुल आणि चार काडतुस आढळली.

उत्तरप्रदेशमध्ये खूनाचा गुन्हा

आरोपीवर गुप्ता आणि डोंबिवली आणि मानपाडा पोलिस ठाणे, पुण्यातील विश्रामबाग, बिवेवाडी, हडपसर येथे तर उत्तरप्रदेश मधील हारगाव, कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये १३ गुन्हे दाखल आहेत. आरोपी अर्पित उर्फ प्रशांत याच्याविरोधात उत्तरप्रदेश येथे खूनाचा गुन्हा दाखल आहे.

Web Title: Inter-state chain snatching gang busted: Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.