अवकाश पर्यटनाच्या दिशेने भारताची यशस्वी वाटचाल सुरू; डॉ. एस. व्यंकटेश्वर शर्मा यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:46 IST2026-01-20T12:45:00+5:302026-01-20T12:46:07+5:30
"इस्रो ही स्वतः एक स्टार्टअपच"

अवकाश पर्यटनाच्या दिशेने भारताची यशस्वी वाटचाल सुरू; डॉ. एस. व्यंकटेश्वर शर्मा यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: भारताची स्वतःची अंतराळ स्थानके, चंद्र व मंगळावरील वसाहती आणि सामान्य नागरिकांसाठी अवकाश पर्यटन, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असल्याचे यू. आर. राव सॅटेलाईट, इस्रोचे माजी कार्यक्रम संचालक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्यंकटेश्वर शर्मा यांनी सांगत भारताच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.
मराठी विज्ञान परिषद आणि इंदाला अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, फार्मसी व आयटीआय, बापसई यांच्या वतीने झालेल्या ‘सृजन कुंभ’ या उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोन्मेष व आंतरशाखीय संशोधन परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. विजय महाजन, डॉ. विनोद मोहितकर, सतीश सूर्यवंशी, दा. कृ. सोमण, जयश्री महाजन, महावीर शंकलेशा, नामदेव मांडगे यांच्यासह माेठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
इस्रो ही स्वतः एक स्टार्टअपच
१९७२ मध्ये इस्रोने आर्यभट्ट या पहिल्या उपग्रह कार्यक्रमाची सुरुवात एका साध्या शेडमधून केली. त्या काळात इंटरनेट नव्हते, माहिती नव्हती, सुविधा नव्हत्या तरीही अवघ्या तीन वर्षांत ३४० किलो वजनाचा उपग्रह तयार करून तो यशस्वीपणे अवकाशात पाठविला.
महान विभूतींच्या भूमीत झालो भावूक
महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक भूमी नसून ती संस्कारांची, शौर्याची आणि विज्ञानाची पवित्र भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या महान विभूतींच्या भूमीत बोलताना आपण अत्यंत भावुक झालो.
मराठी भाषा पूर्णपणे येत नसली तरी मराठी माणसांवर, मराठी संस्कृतीवर आणि महाराष्ट्रावर आपले मनापासून प्रेम असल्याची भावना डॉ. शर्मा यांनी व्यक्त केली. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून महाराष्ट्रासाठी वेळ काढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘शिष्यवृत्तीवर पूर्ण केले शिक्षण’
मी एका छोट्या गावात सरकारी शाळेत शिक्षण घेतले. शिष्यवृत्तीवर शिकून आज या ठिकाणी पोहोचलो. त्यामुळे ग्रामीण भागातून आलो म्हणून न्यूनगंड बाळगू नका. गुण महत्त्वाचे आहेत; पण, त्यापेक्षा जास्त महत्त्व आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि आवड जोपासण्याला आहे, असे सांगत स्टार्टअप्स, उद्योग, विज्ञान, कला या सर्व क्षेत्रांत भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.