अंबरनाथ आणि बदलापुरात ‘कुटुंबं रंगलीयत राजकारणात’; पक्षांत घराणेशाहीला ऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:31 IST2025-10-16T09:31:30+5:302025-10-16T09:31:44+5:30
सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झाली कोंडी, राजकारणाचा वारसा पुढील पिढीकडे सोपवण्याकरिता जवळचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना रिंगणात न उतरवता अंबरनाथ आणि बदलापुरातील बडे राजकीय नेते स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांना पुढे करीत असल्याचे दिसते.

अंबरनाथ आणि बदलापुरात ‘कुटुंबं रंगलीयत राजकारणात’; पक्षांत घराणेशाहीला ऊत
- पंकज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ, बदलापूरमध्ये नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच सत्तेची चावी स्वतःजवळ ठेवण्यासाठी कुटुंबातील जास्तीत जास्त सदस्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडणुकीत विजयी करण्याचा प्रयत्न बड्या नेत्यांनी सुरू केला आहे. मात्र, ‘इलेक्टिव्ह मेरिट’ या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या राजकारणामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे.
राजकारणाचा वारसा पुढील पिढीकडे सोपवण्याकरिता जवळचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना रिंगणात न उतरवता अंबरनाथ आणि बदलापुरातील बडे राजकीय नेते स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांना पुढे करीत असल्याचे दिसते.
वामन म्हात्रे कुटुंब प्रेमात
बदलापूरचे शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना पालिका निवडणुकीत कुटुंबातील सदस्यांना पुढे करावे लागत आहे. यापूर्वी वामन म्हात्रे यांच्यासह लहान बंधू तुकाराम म्हात्रे, पत्नी विना म्हात्रे या नगरसेविका राहिल्या. आता ते मुलगा वरुण यांनाही रिंगणात उतरवणार आहेत. तर, बंधू ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार म्हणून काम पाहत आहेत.
भाजपाचे राजन घोरपडे
बदलापुरात भाजपतर्फे वर्चस्व निर्माण करणारे राजन घोरपडे व त्यांच्या पत्नी रुचिता हे दोघेही नगरसेवक राहिले आहेत. यंदा दोघांचा दावा कायम आहे.
शिंदेसेनेतील राऊत फॅमिली
शिंदेसेनेचे दिवंगत मोहन राऊत यांच्या पत्नी विजया राऊत या नगराध्यक्ष राहिल्या आहेत, तर शीतल राऊत या नगरसेविका राहिल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत शीतल राऊत, प्रवीण राऊत आणि आकाश राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता आहे.
वाळेकर कुटुंबीयांचे वर्चस्व
अंबरनाथमध्ये वाळेकर हे शिंदेसेनेचे शहरप्रमुख असून, त्यांचे कुटुंब कायम राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहे. वाळेकर यांच्या पत्नी मनीषा वाळेकर या नगराध्यक्ष राहिल्या असून, लहान बंधू राजेंद्र वाळेकर व मुलगा निखिल नगरसेवक होते. यंदा हे तिघेही निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत
अजित पवार गटाचे सदाशिव पाटील यांच्यासह मुलगा सचिन, सून अश्विनी व पत्नी, असे सर्वच रिंगणात असतील. तर, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील व त्यांच्या पत्नी या मैदानात उतरतील.