ICU bed want, pay Rs 1.5 lakh first | आयसीयू बेड हवाय, आधी दीड लाख रुपये द्या

आयसीयू बेड हवाय, आधी दीड लाख रुपये द्यालोकमत न्यूज नेटवर्क 
डोंबिवली : एकीकडे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केडीएमसीसह खासगी रुग्णालयांत रुग्णांना बेड मिळत नसताना आयसीयू बेड हवा असल्यास दीड लाख रुपये जमा करावे लागतील, अशी मागणी कल्याण-शीळ रस्त्यावरील साई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून एका अत्यावस्थ अवस्थेतील कोरोना रुग्णाच्या निकटवर्तीयांकडे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कोविड रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी केडीएमटीचे माजी सभापती राजेश कदम यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील लोढा हेवन परिसरात राहणाऱ्या एका ४१ वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली. सर्दी, ताप असल्याने संबंधित रुग्णाला सरकारी आणि खासगी रूग्णालयांनी घरीच उपचार घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, रुग्णाची तब्येत शनिवारी रात्री अचानक ढासळली आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अत्यवस्थ रुग्णाला घेऊन त्याच्या पत्नीने डोंबिवली परिसरात रुग्णालयात आयसीयू बेड कुठे मिळतोय का याचा शोध सुरू केला; परंतु त्यांना कुठेच बेड उपलब्ध होत नव्हता. शेवटी रुग्णाच्या निकटवर्तीयांनी कल्याण- शीळ रोडवरील काटई येथील साई या खासगी कोविड रुग्णालयात  बेडबाबत विचारणा केली असता तेथे आयसीयू बेड उपलब्ध असल्याची माहिती मिळाली; परंतु साई रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे दीड लाख रुपये आगाऊ रक्कम भरावी लागेल, अशी मागणी केली.  मात्र, रात्रीच्या वेळेला एवढ्या मोठया रकमेची तरतूद होऊ शकत नाही, आम्ही आता ५० हजार रुपये भरतो व उद्या दुपारी एकपर्यंत उर्वरित एक लाख रुपये जमा करतो, असे सांगण्यात आले. परंतु दीड लाख रक्कम भरल्याशिवाय रुग्णाला दाखल करून घेतले जाणार नाही, असे सांगण्यात आल्याने अखेरीस आम्ही गंभीर अवस्थेत असलेल्या पतीला मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती पत्नीने दिली.  दरम्यान, याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे याबाबत रुग्णालयाची बाजू समोर येऊ शकली नाही.
कारवाईची मागणी 
साई रुग्णालयात बेड उपलब्ध असतानाही निव्वळ दीड लाखांसाठी रुग्णालय व्यवस्थापनाने एका अत्यवस्थ रुग्णाला बेड उपलब्ध करून दिला नाही. रुग्णाच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि पैशांचा बाजार मांडणाऱ्या अशा रुग्णालयावर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे, अशी तक्रार राजेश कदम यांनी पालिकेकडे केली आहे

Web Title: ICU bed want, pay Rs 1.5 lakh first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.