...तर मी पेट्रोल टाकून आत्मदहन करेन; पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असल्याने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 13:03 IST2021-03-27T13:02:19+5:302021-03-27T13:03:13+5:30
ग्रामीण भागातील सांगाव, सागरली तसेच इतर गावात पाण्याचा नियमित पुरवठा केला जात नाही असा आरोप नागरिक करत आहेत.

...तर मी पेट्रोल टाकून आत्मदहन करेन; पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असल्याने दिला इशारा
डोंबिवली: कल्याणडोंबिवली शहरानजीक असलेल्या 27 गावांमध्ये पाणी टंचाईचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी कपातीसोबत बहुतांश ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. रोज नागरिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जाऊन याबाबत जाब विचारत आहेत. मात्र, केडीएमसी आणि एमआयडीसी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे लोकप्रतिनिधींची पंचाईत झाली आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा इशारा भाजपाच्या माजी नगरसेविका सुनीता पाटील यांनी दिला आहे.
ग्रामीण भागातील सांगाव, सागरली तसेच इतर गावात पाण्याचा नियमित पुरवठा केला जात नाही असा आरोप नागरिक करत आहेत. संतप्त नागरिकांनी अनेकदा याबाबत मोर्चे आणि आंदोलनं करण्याचे ठरविले. मात्र कोरोनाचा काळ लक्षात घेता मी त्यांची समजूत काढली असे सुनीता पाटील।यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
एमआयडीसीला जाब विचारल्यावर , पालिकेकडे आमची भरपूर थकबाकी आहे असे सांगण्यात येते. पालिका आणि एमआयडीसी यांच्यात योग्य तो समन्वय नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे असेही पाटील म्हणाल्या. पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला नाही तर आत्मदहन करू अशा आशयाचे पत्र त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहे.
...तर मी पेट्रोल टाकून आत्मदहन करेन; पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असल्याने दिला इशारा pic.twitter.com/5YgRzyvOqS
— Lokmat (@MiLOKMAT) March 27, 2021