आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 19:51 IST2024-11-26T19:50:53+5:302024-11-26T19:51:14+5:30
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परंतू, आग विझविण्यासाठी वेळ लागत असल्याने सोसायटीतील रहिवासी संतापले आहेत.

आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
कल्याणच्या आधारवाडी परिसरातील एका सोसायटीमधील पंधराव्या मजल्यावर आज संध्याकाळी अचानक भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीतून मोठा धुराचा लोट निघाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परंतू, आग विझविण्यासाठी वेळ लागत असल्याने सोसायटीतील रहिवासी संतापले आहेत.
मनपा आग विझवण्यात अपयशी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी दिल्या आहेत. तांत्रिक बिघाडामुळे अग्निशमन दलाचे वाहन चालत नाहीय. यामुळे पर्यायी ठाण्याहून दुसरे वाहन मागविण्यात आले आहेत, असे केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचे आणि इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र अनेक रहिवासी इमारतीत अडकून पडल्याने बचावकार्य सुरू आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.