डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 01:19 AM2021-04-04T01:19:56+5:302021-04-04T01:20:07+5:30

केडीएमसीची पथके तैनात; कारवाईच्या धास्तीने फेरीवाल्यांची पाठ

Dryness everywhere in the Dombivli railway station area | डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात सर्वत्र शुकशुकाट

डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात सर्वत्र शुकशुकाट

googlenewsNext

डाेंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुभाव टाळण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १ एप्रिलच्या सुधारित आदेशानुसार शनिवार व रविवारी फेरीवाल्यांना व्यवसायास मनाई केली आहे. त्यानुसार शनिवारी फेरीवाले बसू नयेत, यासाठी पूर्वेतील ‘ग’ व ‘फ’ आणि पश्चिमेतील ‘ह’ प्रभागांत केडीएमसीने सकाळी ७ वाजल्यापासून भरारी पथके तैनात केली होती. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि फडके रोड, चिमणी गल्लीतील भाजीमार्केट परिसरात शुकशुकाट होता. मात्र, काही भागांत फेरीवाले सकाळी तसेच सायंकाळी बसलेले आढळून आले. 

आयुक्तांनी होळीच्या अगोदर काढलेल्या आदेशानुसार फेरीवाले आणि दुकानदारांना शनिवार आणि रविवारी व्यवसाय करण्यास मनाई केली होती. मात्र, होळीच्या आदल्या दिवशी दुकानदारांनी डोंबिवलीतील केडीएमसीच्या विभागीय कार्यालयाबाहेर आयुक्तांच्या आदेशाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर आयुक्तांना आपला निर्णय बदलावा लागला होता. त्यामुळे दुकानदारांना शनिवार व रविवारी व्यवसाय करण्यास मुभा, मग आमच्या बाबतीत दुजाभाव का, अशी संतप्त प्रतिक्रिया फेरीवाल्यांमध्ये उमटत आहे. 

मनपा प्रशासनाने निर्णय न बदलल्यास फेरीवाल्यांच्या नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता फेरीवाले बसू नयेत, यासाठी मनपाने सकाळीच भरारी पथके तैनात केली होती. त्याची धास्ती घेत फेरीवाल्यांनी व्यवसाय करणे टाळले. मात्र, काहींनी बसण्याचा प्रयत्न केला असता मनपाच्या पथकांनी त्यांना कारवाईची तंबी दिली. त्यामुळे फेरीवाल्यांनीही काढता पाय घेतला. 

‘ग’ प्रभागात रमाकांत जोशी यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी रामनगर, एस. व्ही. पथ, शिवमंदिर रोड, पाटकर रोड, डॉ. राथ रस्ता, उर्सेकरवाडी तर, पश्चिमेत ‘ह’ प्रभागात बाजीराव आहेर यांनी दीनदयाळ, घनश्याम गुप्ते रोड, महात्मा फुले रोड आणि सुभाष रोड येथे कर्मचारी तैनात केले होते. ‘फ’ प्रभागात फडके रोड, मानपाडा  रोड, टाटा पॉवर लेन, स्काय वॉक आदी ठिकाणी फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला. 
दुसरीकडे नागरिकांनी ११ वाजल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरात येण्याचे टाळल्याने तेथे गर्दी आटोक्यात असल्याचे निदर्शनास आले. 

काही भागांत मात्र फेरीवाल्यांचे बस्तान 
पूर्वेत गोग्रासवाडी, मानपाडा रोड, सुनीलनगर, दत्तानगर, नेहरू मैदान, ठाकुर्ली येथे भाजीपाला व फळविक्रेते व्यवसाय करताना आढळले. सायंकाळच्या वेळी फडके रोड, छेडा रोडे येथे फेरीवाले, हातगाडीवाले व्यवसाय करत होते. 
 पश्चिमेत गुप्ते रोड, नवापडा, उमेशनगर येथेही काही प्रमाणात फेरीवाले, रस्त्यावर चीजवस्तू विक्री करणारे आढळून आले. मात्र, कारवाईच्या भीतीने पथारी आवरून सावधगिरी बाळगून काहींनी छुप्या पद्धतीने मालाची विक्री केली. 
 काही ठिकाणी मनपाच्या पथकाची पाठ फिरताच फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आयुक्तांनी दुकानदारांना 
शनिवार, रविवारी व्यवसाय करण्यास मुभा दिल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण होते.

Web Title: Dryness everywhere in the Dombivli railway station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.