गणेश विसर्जनावेळी ओढवले विघ्न; मंडळाच्या कार्यकर्त्याचा वीजेच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 16:22 IST2021-09-20T15:23:07+5:302021-09-20T16:22:05+5:30
कल्याणमधील दुर्दैवी घटना

गणेश विसर्जनावेळी ओढवले विघ्न; मंडळाच्या कार्यकर्त्याचा वीजेच्या झटक्याने मृत्यू
कल्याण: विसर्जनासाठी गणेश मूर्ती मंडपाबाहेर काढल्यावर वीजेच्या झटक्याने प्रशांत जनार्दन चव्हाण (वय 28) या तरुण कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना येथील पश्चिमेकडील बेतुरकरपाडा परिसरातील एव्हरेस्टनगर सोसायटीत रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
दरवर्षी सोसायटीच्या कार्यालयात एव्हरेस्ट नगर मित्र मंडळातर्फे दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा देखील मंडळाकडून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
रविवारी रात्री विसर्जनासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशमुर्ती मंडपाबाहेर काढली आणि ती टेम्पोत नेऊन ठेवली. त्यावेळी जोरदार पाऊस पडत होता. त्याचवेळी मंडपातील वीज गेली आणि सर्वत्र अंधार पसरला. तेव्हा त्याठिकाणी उपस्थित असलेला मंडळाचा कार्यकर्ता प्रशांत चव्हाण वीज का गेली हे तपासण्यासाठी पुन्हा मंडपाच्या ठिकाणी गेला. इलेक्ट्रीक बोर्डची तपासणी करत असताना त्याला वीजेचा जोरदार झटका बसला. यावेळी झालेल्या आवाजाने मंडळाचे अन्य कार्यकर्त्यानी त्या ठिकाणी धाव घेतली.
प्रशांतला रिक्षातून नजीकच्या खाजगी रूग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. मात्र त्याठिकाणी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून प्रशांतच्या पश्चात आई आणि लहान भाऊ आहे. प्रशांत हार,फुले विक्रीचा व्यवसाय करायचा तसेच रिक्षाही चालवायचा. दरम्यान या घटनेची नोंद महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.