ठाकरे पिता-पुत्र डोंबिवलीत येतील का याचीच चर्चा सुरू, केडीएमसीतील अनेक नेते गेले पक्ष सोडून
By अनिकेत घमंडी | Updated: November 15, 2025 11:42 IST2025-11-15T11:42:32+5:302025-11-15T11:42:39+5:30
KDMC Election : कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका निवडणूक समोर दिसत असताना उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपचा रस्ता धरला. खासदार संजय राऊत यांच्यासारखे आक्रमक नेते प्रकृतीच्या मर्यादांमुळे प्रचाराला येण्याची शक्यता कमी आहे.

ठाकरे पिता-पुत्र डोंबिवलीत येतील का याचीच चर्चा सुरू, केडीएमसीतील अनेक नेते गेले पक्ष सोडून
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका निवडणूक समोर दिसत असताना उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपचा रस्ता धरला. खासदार संजय राऊत यांच्यासारखे आक्रमक नेते प्रकृतीच्या मर्यादांमुळे प्रचाराला येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्धव व आदित्य ठाकरे हे पिता-पुत्र डोंबिवलीत येतील का? असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला आहे. मनसेचे नेते राजू पाटील व अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारामुळे उद्धवसेनेला हातभार लागेल, अशी परिस्थिती आहे.
लोकसभेत पावणेचार लाख आणि विधानसभेत कल्याण पश्चिमेला ८० हजार आणि डोंबिवलीमध्ये ४६ हजार मते उद्धवसेनेच्या उमेदवारांना मिळाली होती. कल्याण पश्चिमेला सचिन बासरे यांना मिळालेली मते ही उद्धवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते होती. असे असतानाही आता पक्षाची होणारी पडझड ठाकरे यांना थांबवता येत नसल्याची खंत कार्यकर्त्यांमध्ये आहे.
पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत धुसफूस असून, ऑगस्ट महिन्यात पक्षाचे माजी शहरप्रमुख अभिजित सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांना जे पत्र दिले होते त्यामध्ये ज्यांनी पक्ष सोडला ते दीपेश म्हात्रे आणि विद्यमान प्रभारी जिल्हाध्यक्ष तात्या माने यांच्या पक्ष विरोधी कारवायांचा निषेध म्हणून राजीनामा दिल्याचा उल्लेख केला होता. त्याआधी सावंत यांनी मे महिन्यात ठाकरे यांच्या भेटीत १३ जणांच्या नावानिशी तक्रार केली होती. त्यापैकी बहुतांश नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गुरुवारी डोंबिवलीमध्ये लागलेल्या बॅनरबाजीमुळे उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख, उपनेते गुरुनाथ खोत यांनी येऊन इथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.