आधी मुंब्रा रेतीबंदर, आता डोंबिवली; पुन्हा एकदा खाडीत रुतलेला मृतदेह आढळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 17:12 IST2021-03-26T17:11:06+5:302021-03-26T17:12:30+5:30
देवीचापाडा खाडी परिसरात चिखलात रुतलेल्या स्थितीत सापडला मृतदेह; अद्याप ओळख पटलेली नाही

आधी मुंब्रा रेतीबंदर, आता डोंबिवली; पुन्हा एकदा खाडीत रुतलेला मृतदेह आढळला!
डोंबिवली: गुरुवारी संध्याकाळी डोंबिवली पश्चिमेकडील देवीचापाडा खाडी परिसरातील चिखलात एका ४० ते ४५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अशाच ्प्रकारे व्यवसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्य्रातल्या रेतीबंदरमध्ये आढळला होता.
संध्याकाळच्या सुमारास पोलीस पाटील लक्ष्मीकांत पाटील यांना खाडी परिसरात एक मृतदेह आढळला. त्यांनी याबाबत विष्णूनगर पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक घनश्याम बेंद्रे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटण्यासारखी कोणतीच वस्तू सापडली नाही. या व्यक्तीची हत्या करण्यात आली की त्याने आत्महत्या केली याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच यामागचे नेमके कारण समजेल असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.