दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलीची हत्या; मारहाणीत वडीलही गंभीर जखमी
By मुरलीधर भवार | Updated: May 6, 2025 15:41 IST2025-05-06T15:40:23+5:302025-05-06T15:41:34+5:30
कल्याण पोलिसांनी पाच आरोपींना ठोकल्या बेड्या

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलीची हत्या; मारहाणीत वडीलही गंभीर जखमी
मुरलीधर भवार
कल्याण- दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पाच जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्यामध्ये घडली. हल्ल्या दरम्यान मध्यस्थी करायला गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. मयत मुलीचे नाव सानिया बागवान असे आहे. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद राहतात. याच परिसरात गुलाम शेख नावाचा व्यक्ती राहतो. गुलाम शेख याने निसार सय्यद यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. निसार सय्यद यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून गुलाब शेख आणि निसार सय्यद यांच्यामध्ये किरकोळ वाद देखील झाला होता. त्यानंतर निसार सय्यद हे घरी गेले. निसार सय्यद कुटुंबासह घरात जेवण करीत असताना गुलाम शेख याचा मुलगा अब्दुल घरात आला. त्याने निसार यांना विचारले की तू माझ्या वडिलांसोबत का वाद केला? यावरून अब्दुल यांनी निसार सय्यद यांना लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. यावेळी निसार यांची मुलगी सानिया बागवान मध्यस्थी करायला आली. मध्यस्थी करत असताना गुलाम शेख अब्दुल आणि त्यांच्या परिसरात राहणारे तीन मित्र शोएब शेख, अजिज शेख, आणि शाहिद शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत सानिया बागवान हिचा मृत्यू झाला तर निसार सय्यद हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी या प्रकरणात तपास सुरू केला. या प्रकरणात एक तासाच्या आत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सानिया बागवान हिची हत्या करणाऱ्या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.