लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजता नवनीतनगरमध्ये घडली. यामध्ये पाच वर्षांच्या मुलासह पाचजण जखमी झाले. यामधील एकाची प्रकृती गंभीर आहे.
नवनीतनगरमधील ‘डब्ल्यू’ विंग इमारतीत पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ५१० मध्ये राहणाऱ्या केतन हरिलाल देढीया (वय ३५) यांच्या घरात सिलिंडरमधील गॅसगळतीनंतर स्फोटाची घटना घडली. त्यानंतर घराला भीषण आग लागली. स्फोटात केतन हे ५० टक्के भाजले. स्फोट भीषण होता की, बाजूच्या दोन फ्लॅटचेही नुकसान होऊन त्या घरातील व्यक्तींनाही दुखापत झाली. यात फ्लॅट क्रमांक ५११ मधील मेहुल शांतीलाल वासड (वय ४०), फ्लॅट क्रमांक ५०६ मधील विजय घोर (वय ४५) हे जखमी झाले. तर फ्लॅट क्रमांक ९ मध्ये राहणारे हरीश कांतीलाल लोढाया (वय ५० ) हे आणि त्यांचा मुलगा पार्श्व (वय ५) हे घराबाहेर असताना स्फोटात खाली कोसळलेल्या स्लायडींगच्या काचा त्यांच्यावर कोसळल्याने जखमी झाले. केतन वगळता या चौघांना किरकोळ दुखापत झाली झाली.
दिवे सुरू केले आणि स्फोटाचा बसला तडाखा
केतन हे घर बंद करून घराबाहेर गेले होते. ते रात्री साडेअकरा वाजता घरी आले असता त्यांनी लाइट सुरू केला आणि स्फोट झाला. घरातील सिलिंडरमधून गळती होऊन घरभर गॅस साठला असावा आणि लाइट चालू करताच विजेचा स्पार्क होऊन स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
घाटकोपर येथे तिघे होरपळले
- घाटकोपर (पश्चिम) येथील नारायण नगर परिसरातील एका इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. यामध्ये तिघे जण होरपळले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दलाने दुपारी एकच्या सुमारास आग विझविली.
- नारायण नगरमधील युनियन बँक बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील गाळा क्रमांक २०९ मध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सकाळी पावणे अकरा वाजता आगीला ‘लेव्हल-१’ घोषित करण्यात आले.
अडीच तास आगीशी झुंज
- या आगीत गाळ्यातील इलेक्ट्रिक वायरिंग, पंखे, इस्त्री, स्टीमर, लाकडी फर्निचर, शिलाई मशीन, तयार कपडे, स्टीलचे रॅक आणि फाईल्स असे साहित्य जळून खाक झाले. सुमारे दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले.
- दुर्घटनेत तीन कामगार भाजले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तिन्ही रुग्णांनी उपचारांसाठी स्वतःच्या जबाबदारीवर अन्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी राजावाडी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे.
Web Summary : A gas cylinder explosion in Dombivli injured five people, including a five-year-old child. The blast damaged multiple flats. Separately, a fire in Ghatkopar injured three workers in an industrial estate; they were moved to another hospital for treatment.
Web Summary : डोंबिवली में गैस सिलेंडर विस्फोट में पांच लोग घायल हो गए, जिनमें एक पांच साल का बच्चा भी शामिल है। विस्फोट से कई फ्लैट क्षतिग्रस्त हो गए। अलग से, घाटकोपर में एक औद्योगिक क्षेत्र में आग लगने से तीन मजदूर घायल हो गए; उन्हें इलाज के लिए दूसरे अस्पताल में ले जाया गया।