CoronaVirus News : मद्यविक्रीसाठी व्हॉट्सअॅपचा आधार; विक्रेत्यांनी लढवली अनोखी शक्कल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 21:10 IST2021-03-30T21:08:31+5:302021-03-30T21:10:30+5:30
CoronaVirus News : काही विक्रेत्यांनी व्हॉट्सअॅपवर मद्याची ऑर्डर स्वीकारून घरपोच सेवा देण्याचा नवा फडा अंमलात आणला आहे.

CoronaVirus News : मद्यविक्रीसाठी व्हॉट्सअॅपचा आधार; विक्रेत्यांनी लढवली अनोखी शक्कल!
- मयुरी चव्हाण
कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत सोमवारी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश असतानाही अनेक वाईन शॉपमधून मद्य विकले जात असल्याचे दिसून आले. होळीचे जोरदार सेलिब्रेशन करण्यासाठी मद्यपींनी दुकानाबाहेर एकच गर्दी केली होती. काही वाईन शॉपीवर कारवाई करण्यात आली असली तर सुट्टीच्या दिवशी गर्दीला आवर घालायचा कसा? असा प्रश्न मद्य विक्रेत्यांना पडला आहे. यावर उपाय म्हणून कल्याण डोंबिवलीतील काही विक्रेत्यांनी व्हॉट्सअॅपवर मद्याची ऑर्डर स्वीकारून घरपोच सेवा देण्याचा नवा फडा अंमलात आणला आहे. (WhatsApp support for alcohol sales, ideas by vendors)
शनिवारी आणि रविवारी मद्याला सर्वाधिक मागणी असते. त्यात होळी असल्याने आपला खिसा गरम करण्यासाठी सोमवारी दुकानं बंदचे निर्देश असूनही विक्रेत्यांनी मद्य विकले. तर दारूसाठी काय पण असे म्हणत मद्यपींनी सुद्धा दुकानाभोवती एकच गर्दी केली होती. या आठवड्याच्या आकडेवारीचा अंदाज घेत येणाऱ्या काळात अधिक कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या धंदा तेजीत राहावा म्हणून वाईन शॉप मालकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून जाहिरात करायला सुरुवात केली आहे. ऑर्डर दिल्यावर ग्राहकाला घरपोच सेवा दिली जात आहे. जास्त ऑर्डर असल्यास फ्री होम डिलिव्हरीचा पर्याय देण्यात आला असून कमी जास्त अंतरानुसार होम डिलिव्हरीचे पैसे आकारले जात आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मद्यविक्रेत्यांनी हिच शक्कल लढवत व्यवसाय सुरू ठेवला होता. आता सुट्ट्यांच्या दिवशी होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा व्हॉट्सअॅपचा आधार घेतला जात आहे. तर काहींना ऑनलाइन फसवणूक होण्याची भीती वाटत आहे. कारण, गेल्यावर्षी ऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली पूजा वाईन शॉपीने अनेक मद्यपींची फसवणूक झाली होती. अनेकांनी ऑनलाईन पेमेंट करूनही त्यांना मद्य मिळाले नव्हते. मात्र, आता मद्याची डिलिव्हरी मिळाल्यावरच रोख रक्कम ग्राहकांकडून घेतले जात आहे.
मद्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होम डिलिव्हरी मागील वर्षी कोरोना संकट काळातही दिली होती. यामुळे आता सुद्धा होम डिलिव्हरी सुरु केल्यामुळे आम्हालाही गर्दी टाळता येणे शक्य होणार आहे. ग्राहकांचाही होम डिलिव्हरीच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे ठाकुर्ली येथील एका वाईन शॉप मालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
फेक वाईन शॉपीवाल्यांकडून सावधान!
माझ्या एका मित्राने 900 रुपये मद्यासाठी गुगल पे वरून एका फेक वाईन शॉप वाल्याला दिले होते. मात्र अजून त्याला मद्य मिळाले नसून त्याचा नंबर ब्लॉक करण्यात आला आहे. याबाबत मित्राने माहिती देऊन इतरांनाही फेक वाईन शॉपीवाल्यांकडून सावध करण्याचा सल्ला दिला आहे, असे तुषार साटपे या तरुणाने सांगितले.