CoronaVirus News : केडीएमसीतर्फे कोविड रुग्णालयांवर पुन्हा ऑडिटर्सच्या नियुक्त्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 19:52 IST2021-03-30T19:52:03+5:302021-03-30T19:52:43+5:30
KDMC re-appoints auditors at covid Hospitals : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने पुन्हा कोविड रुग्णालयांवर ऑडिटर्सच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

CoronaVirus News : केडीएमसीतर्फे कोविड रुग्णालयांवर पुन्हा ऑडिटर्सच्या नियुक्त्या!
कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत गतवर्षी कोरोना काळात अनेक खाजगी कोविड रुग्णालयात रुग्णांना येणारी अव्वाच्या सव्वा बिलं व बेडच्या उपलब्धतेवरून अनेक वाद व सावळागोंधळ समोर आला होता. या पार्श्वभूमीवर शासनाच्या अधिसूचनेनुसार खाजगी कोविड रूग्णालयांमध्ये कोविड रूग्णाला वाजवी दरात उपचार उपलब्ध व्हावेत, तसेच त्यांना सहजरित्या बेड उपलब्ध व्हावा, याकरिता सदर रूग्णालयांमध्ये महापालिकेमार्फत ऑडिटर्सच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. तथापि कोविड रूग्णसंख्या कमी झाल्यामुळे फेब्रुवारी 2021 मध्ये नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने पुन्हा कोविड रुग्णालयांवर ऑडिटर्सच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. (CoronaVirus News: KDMC re-appoints auditors at covid Hospitals)
ऑडिटर्स संबंधित कोविड रूग्णालयात कोविड रुग्णांना डिस्चार्ज करताना त्यांना आकारलेल्या बिलांची शासन नियमांनुसार तपासणी करून जादा आकारणी केल्याचे निदर्शनास आल्यास ही बाब रूग्णालयाच्या लक्षात आणून देतील व रूग्णास वाजवी बिले दिल्याबाबत खातरजमा करतील असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोविड रूग्णालयांमध्ये ऑडिटर्सची नेमणूक केल्यामुळे अवाजवी बिल आकारणीवर नियंत्रण येणार आहे असे जरी सांगण्यात येत असले तरी येणा-या काळातच या नियुक्त्या किती उपयुक्त ठरतात ते पाहावे लागेल.