CoronaVirus Lockdown News: नव्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:49 IST2021-04-07T00:48:50+5:302021-04-07T00:49:01+5:30
कल्याण-डोंबिवली शहरे : नियमांची माहिती वेळेत पोहोचलीच नसल्याच्या तक्रारी

CoronaVirus Lockdown News: नव्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत सोमवारी रात्री ८ पासून मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, नव्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले. नव्या नियमांची माहिती प्रशासनाकडून वेळेत आमच्यापर्यंत पोहोचली नाही, अशा तक्रारी व्यापाऱ्यांनी केल्या आहेत. मिनी लॉकडाऊनच्या विरोधात नाराजी व्यक्त करताना व्यापाऱ्यांनी त्यात काही प्रमाणात सूट देण्याची मागणी केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या मनपा हद्दीत झपाट्याने वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी रात्री कर्फ्यू, तर दिवसा जमावबंदी आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. शुक्रवार ते सोमवार वीकएण्ड लॉकडाऊन असणार आहे. मात्र, सोमवार ते शुक्रवारदरम्यान दुकाने सुरू राहतील, असा व्यापाऱ्यांचा समज होता. परंतु, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने सोमवार रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील, असा आदेश केडीएमसीने सोमवारी काढला. मात्र, हा आदेश त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचला नाही. या आदेशाबाबत संभ्रमही होता. त्यामुळे काही ठिकाणी दुकानदारांनी दुकाने सुरू ठेवली होती. पोलिसांनी उद्घोषणा करून दुकाने बंद करा; अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. तेव्हा त्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे सोमवारी मनपाने काढलेल्या नव्या आदेशामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. सरकारने तशा प्रकारचे आदेश काढताना त्यात सुस्पष्टता ठेवली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
‘१२ ते ४ व्यवसाय करू द्या’
कपड्यांच्या दुकानदारांनी सांगितले की, मार्च २०२० मधील लॉकडाऊन कडक होता. त्यामुळे मागच्या वर्षी लग्न सराईत आम्हाला मोठा फटका बसला. आताही लग्न सराई आहे. अनेकांनी लग्नाच्या कपड्यांची ऑर्डर दिली आहे. आता त्यांना कपडे कसे देणार, असा प्रश्न आहे. लग्नसराईतील व्यवसायावर पाणी फेरणार आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांतून कोरोना पसरतो का, असा सवाल कल्याणमधील व्यापाऱ्यांनी केला आहे. दुकानदारांनी किमान दुपारी १२ ते ४ दरम्यान तरी व्यवसाय करू द्यावा. सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याची मुभा द्यावी. रिक्षा, लोकल, खाजगी व सरकारी बससेवा सुरू आहे. मग आमच्यावर गंडांतर का? प्रशासनाने मिनी लॉकडाऊनचा आदेश काढताना दुजाभाव केला आहे, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.