Coronavirus: ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांना लसीकरण आणि चाचणी शिवाय प्रवेश नको - मनसे आमदार राजू पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 19:32 IST2021-04-27T19:31:27+5:302021-04-27T19:32:10+5:30
गतवर्षी दोन अँम्ब्युलन्ससाठी आमदार निधी दिला होता. मात्र अजूनही अँम्ब्युलन्स मिळालेल्या नाही.

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांना लसीकरण आणि चाचणी शिवाय प्रवेश नको - मनसे आमदार राजू पाटील
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रूग्णांच्या नातेवाईकांना देखील बेड , इंजेक्शन व ऑक्सिजन साठी वणवण फिरावे लागत आहे. ठाण्यात ऑक्सिजन अभावी एका रुग्णालयात चार लोक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीडिओ कॉन्फरद्वारे कल्याण डोंबिवली मधील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ठाणे जिल्ह्यात बाहेरील लोंढे पुन्हा येताना त्यांची कोरोना चाचणी , लसीकरण आणि नाव नोंदणी केल्याशिवाय प्रवेश देऊ नये अशी सूचना कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली.
गतवर्षी दोन अँम्ब्युलन्ससाठी आमदार निधी दिला होता. मात्र अजूनही अँम्ब्युलन्स मिळालेल्या नाही. कोविडकरिता दिलेल्या आमदार निधीचा विनियोग जलदगतीने करण्यात यावा असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच लसीकरण, बेड्स व रेमडिसिव्हीर इंजेक्शन बाबतही त्यांनी महत्वाचे मुद्दे देखील त्यांनी मांडले. ठाणे जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात याव्यात. पून्हा येताना परप्रांतीयांना थेट प्रवेश न देता त्यांची कोरोना चाचणी तसेच लसीकरण करून व नाव नोंद करूनच त्यांना प्रवेश द्यावा अशी आग्रही मागणी पाटील यांनी यावेळी केली. आढावा बैठक घेण्याच्या आपल्या मागणीला मान देऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीचे आयोजन केले याकरिता पाटील यांनी शिंदे यांचे आभार मानले.