प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त विधान भोवलं; मृणाल जाधव हिचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 21:02 IST2026-03-23T21:00:33+5:302026-03-23T21:02:26+5:30
२७ फेब्रुवारी रोजी जाधव हिने श्रीरामांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर टाकला होता.

प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त विधान भोवलं; मृणाल जाधव हिचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
मुरलीधर भवार
कल्याण - बदलापूरात राहणारी तरुणी मृणाल जाधव हिने श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला होता. या प्रकरणी तिने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जाधव हिचा जामीन अर्ज फेटालून लावला आहे. त्यामुळे जाधव हिचा मुक्काम आधारवाडी कारागृहात राहणार आहे.
२७ फेब्रुवारी रोजी जाधव हिने श्रीरामांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर टाकला होता. हा व्हिडिओ पाहताच हिंदुत्ववादी संघटनांनी तिच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत तिच्या विराेधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मृणालला तातडीने अटक करावी अशी मागणी केली होती. बदलापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत जाधव हिला अटक केली होती. ती सध्या न्यायालयीन काेठडीत आहे. जाधव हिने प्रथम अंबरनाथ न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. तिचा अर्ज अंबरनाथ न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर तिने पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी होती.
या प्रकरणी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष राणी जवळेकर यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या वतीने वकिल रेश्मा भोपी यांनी युक्तीवाद केला. जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी हिंदुत्ववादी संघटनाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी न्यायालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते. वकिल भोपी यांनी युक्तीवाद केला की, आरोपी जाधव हिला जामीन मंजूर केल्यास या प्रकरणातील तपास कामात हस्तक्षेप केला जाऊ शकतो. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत जाधव हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणातील फिर्यादी जवळेकर यांनी सांगितले की, २६ मार्च रोजी रामनवमी आहे. श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जाधव हिला न्यायालयाने जामीन नाकारल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.