‘सुमित’ला कंत्राट दिल्यानंतर केली कंपनीची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 09:41 IST2025-07-27T09:40:43+5:302025-07-27T09:41:09+5:30
कंपनीचे संचालक अमित साळुंके याला दारू आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झारखंड पोलिसांनी अटक केली,

‘सुमित’ला कंत्राट दिल्यानंतर केली कंपनीची स्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचरा उचलण्याचे कंत्राट दिल्यानंतर १९ दिवसांनंतर सुमित कंपनीची स्थापना झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दहा वर्षांच्या कंत्राटाकरिता महापालिका दरवर्षी ८५ कोटी रुपयांनुसार अब्जावधी रुपये देणार आहे. यामुळे कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चेन्नई पॅटर्नप्रमाणे कल्याण-डोंबिवली शहरातील स्वच्छतेचा पॅटर्न राबविण्यासाठी सुमित कंपनीला कचरा संकलनाचे कंत्राट देण्यात आले. मात्र, कंपनीला कचरा उचलण्याचा कोणताही अनुभव नाही. ही कंपनी पुण्याची असून, चेन्नईमध्ये या कंपनीने कोणतेही काम केले नसल्याची माहिती आहे. कंपनीकडून केवळ हाउसकिपिंग आणि पेस्ट कंट्रोलची कामे केली जातात. मात्र, तिला कचरा उचलण्याचा ठेका दिला गेला. दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी महापालिकेने या कंपनीला कचरा उचलण्याचा कार्यादेश दिला आहे. मात्र, कंत्राट दिल्यानंतर दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीची स्थापना केल्याचे समजते. कंत्राट देताना अनियमितता झाल्याचा उद्धवसेनेचा आरोप आहे. या अनियमिततेच्या चौकशीची मागणी त्या पक्षाने केली.
संचालक अटकेत
कंपनीचे संचालक अमित साळुंके याला दारू आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झारखंड पोलिसांनी अटक केली, साळुंके यांच्याविरुद्ध पुण्यातही काही आरोप आहेत. ज्या कंपनीच्या संचालकाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली आहे.
प्रशासनावर टीका
मालमत्ताधारकाकडून ६०० रुपये आकारले जात होते, आता त्यात ३०० रुपये वाढवून ९०० रुपये केले. पालिका सुमित कंपनीला दहा वर्षांसाठी तब्बल ८५ अब्ज रुपये देणार आहे. यापूर्वी अँथोनी वेस्ट हँडलिंग कंपनीला दहा वर्षांसाठी कंत्राट दिले होते, नंतर आर अँड डिला कंत्राट दिले. दोन्ही कंत्राट रद्द होण्यामुळे पालिका प्रशासनावर टीका झाली होती.