कल्याणमध्ये विकासाचं नारळ फुटलं; खासदारांच्या हस्ते भूमीपूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 17:55 IST2021-10-26T17:52:52+5:302021-10-26T17:55:01+5:30
खासदारांनी पक्षभेद न ठेवता भाजपच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी यांच्या प्रभागातही विकास कामांकरीता निधी मंजूर केला आहे.

कल्याणमध्ये विकासाचं नारळ फुटलं; खासदारांच्या हस्ते भूमीपूजन
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी नगरविकास खात्याकडून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ३ कोटींच्या विकास कामांचा नारळ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते काल फोडण्यात आला. याकडे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, युवा सेनेचे दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक धनंजय बोडारे, महेश गायकवाड, रमेश जाधव, शरद पाटील, सुशीला माळी, निलेश शिंदे, स्नेहल पिंगळे, शीतल मंडारी, संगीता गायकवाड, नवीन गवळी, भाजपच्या रेखा चौधरी आदी उपस्थित होते.
कचोरे, मंगलराघो नगर, चिकणीपाडा, जरीमरीनगर, गणोशवाडी, भगवाननगर, साईनगर, शनीनगर, विजयनगर, तिसगाव गावठाण, जाईबाई शाळा, नंददीप नगर, विनायक चौक, दुर्गामाता मंदिर, आनंदवाडी, आदी ठिकाणी विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. अन्य नगरसेवकांनीही निधीची मागणी केली आहे. त्यांच्याही प्रभागात कामे करण्यासाठी निधी दिला जाईल.
खासदारांनी पक्षभेद न ठेवता भाजपच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी यांच्या प्रभागातही विकास कामांकरीता निधी मंजूर केला आहे. त्यांच्या प्रभागातील विकास कामांचे भूमीपूजन काल करण्यात आले. यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका चौधरी यांनी खासदार शिंदे यांचे आभार मानले. त्यांनी विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार खासदारांनी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे विकास काम मार्गी लागणार असल्याचे सांगितले.