'नागरिक पलायन करतायत'; भारत गंगोत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 19:07 IST2025-09-13T18:59:40+5:302025-09-13T19:07:09+5:30
उल्हासनगर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहरजिल्हाध्यक्ष पदी राहिलेले, भारत गंगोत्री यांनी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती.

'नागरिक पलायन करतायत'; भारत गंगोत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष
- सदानंद नाईक
उल्हासनगर : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी पुन्हा एकदा भारत गंगोत्री यांची निवड झाली. त्यांनी शनिवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्ष मजबूत करण्याची माहिती दिली. शहर विकास ठप्प पडला असून पलायन करीत असलेल्या हजारो नागरिकांना ब्रेक लावण्याचे संकेत दिले.
उल्हासनगर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहरजिल्हाध्यक्ष पदी राहिलेले, भारत गंगोत्री यांनी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र महायुतीकडून विधानसभेची उमेदवारी भाजपचे आमदार कुमार आयलानी यांना देऊन ते मोठ्या मताधिक्याने आमदार पदी निवडून आले. भारत गंगोत्री यांनी शहरजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून आमदार आयलानी यांच्या विरोधात निवडणूक लढवून रंगत आणली होती. गंगोत्री यांनी शहरजिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. भारत गंगोत्री यांच्यावर पक्षप्रमुख अजित पवार यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवित शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड केली. एका महिन्यापूर्वी शहर जिल्हाकार्यकारणी जाहीर करण्याचे संकेत गंगोत्री यांनी यावेळी दिली.
गंगोत्री यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन शहरातील विविध समस्याचा पाडा वाचून हजारो नागरिक शहरातून पलायन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील जागेची किंमत वाढण्या ऐवजी घटत असून पलायनला ब्रेक लावून शहर विकासासाठी आपण कलानी यांच्यासोबतही काम करण्यास तयार असल्याचे म्हणाले. महापालिकेच्या संपूर्ण ७८ वॉर्डसाठी पक्षांकडून तयारी सुरू असून महायुती झाल्यास पक्ष नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गंगोत्री यांनी शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर, त्यांनी निष्ठावंत व पक्षाच्या जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक घेऊन कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी पक्षाच्या सोनिया धामी, पक्षाचे प्रदेश सरसिटणीस प्रवीण खरात, विशाल माखीजा यांच्यासह पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.