गवळी दाम्पत्याविरोधात दोषारोपपत्र दाखल, कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:19 IST2025-02-22T08:18:31+5:302025-02-22T08:19:31+5:30
जलदगती न्यायालयात हा खटला चालवला जाणार असून, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहणार आहेत.

गवळी दाम्पत्याविरोधात दोषारोपपत्र दाखल, कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात
कल्याण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी, त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांविरोधात कोळसेवाडी पोलिसांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी ९४८ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. जलदगती न्यायालयात हा खटला चालवला जाणार असून, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहणार आहेत.
२३ डिसेंबर २०२४ रोजी कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर गवळीने अत्याचार करून तिची हत्या केली. यात विशालची पत्नीने साथ दिली. पोलिसांनी आधी साक्षीला अटक केली होती.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे
तिच्या चौकशीनंतर बुलढाणा येथील शेगावमधून एका सलूनमधून विशालला ताब्यात घेतले होते. मुलीच्या हत्येनंतर विशाल, साक्षीने मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला.
या प्रकरणात तांत्रिकदृष्ट्या सर्व पुरावे जमा केले आहेत. मुलीचे अपहरण करून तिचा मृतदेह फेकून देण्याच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे.
त्रुटी राहू नये यासाठी पोलिसांनी घेतली काळजी
कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याणचे सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह तपास अधिकारी गणेश न्यायदे यांनी दोषारोपपत्र दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कुठलीही त्रुटी राहू नये याची काळजी पोलिसांनी घेतली आहे. कल्याण जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून करण्यात आली.
त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता लवकरच सुरू होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.