"तो कर तात्काळ रद्द करा"; घनकचरा उपविधिकर विरोधात भाजपाचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 17:56 IST2021-06-26T17:54:16+5:302021-06-26T17:56:07+5:30
BJP News : करविरोधात हजारो डोंबिवली कल्याणकरांनी महानगरपालिकेच्या लेखी स्वरूपात निषेध व्यक्त करणारे अर्ज दाखल केले असल्याचे चव्हाण म्हणाले.

"तो कर तात्काळ रद्द करा"; घनकचरा उपविधिकर विरोधात भाजपाचे आंदोलन
डोंबिवली - महानगरपालिकेने एकाधिकारशाही पद्धतीने नागरिकांवर घनकचरा उपविधी आकारण्याचा निर्णय लादला आहे. या पूर्वीच कचरा कराविरोधात नागरिकांच्या तीव्र भावना महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना कळवल्या आहेत. सामान्य नागरिक कोविड महामारीने त्रस्त असताना लॉकडाऊन काळात हाताचे काम गेले असताना, आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांवर नाहक कराचा बोजा वाढविण्याचे धोरण हेतुपुरस्सर राबवले जात आहे, तो तात्काळ रद्द करावा अन्यथा शुक्रवारी, २ जुलै रोजी महापालिकेवर भाजपातर्फे निषेध आंदोलन करण्यात येईल असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी जाहीर केले.
करविरोधात हजारो डोंबिवली कल्याणकरांनी महानगरपालिकेच्या लेखी स्वरूपात निषेध व्यक्त करणारे अर्ज दाखल केले असल्याचे चव्हाण म्हणाले. जनादर राखून घनकचरा उपविधी स्थगित करून नागरिकांना दिलासा द्यावा असेही त्यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले. मोर्चामुळे उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्था व सार्वजनिक आरोग्य विषयक परिस्थितीस सध्या महापालिका प्रमुख या नात्याने आयुक्त सर्वस्वी जबाबदार असतील असेही चव्हाण म्हणाले.