बंदी असताना सोनारपाड्यात बैलांची झुंज, मानपाडा पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 05:49 IST2025-01-21T05:48:56+5:302025-01-21T05:49:29+5:30
Dombivli Crime News: बैलांच्या झुंजीवर बंदी असतानाही डोंबिवली येथील सोनारपाडा परिसरात झुंजीचे आयोजन केले होते. ती पाहायला तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बंदी असताना सोनारपाड्यात बैलांची झुंज, मानपाडा पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा
डोंबिवली - बैलांच्या झुंजीवर बंदी असतानाही डोंबिवली येथील सोनारपाडा परिसरात झुंजीचे आयोजन केले होते. ती पाहायला तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मानपाडा पोलिसांनी मालक रोशन दळवी, गणेश साळवी, बारक्या मढवी यांच्यासह आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला.
रविवारी सकाळी सात ते आठदरम्यान सोनारपाडा येथील मैदानावर बैलांच्या झुंजीचे आयोजन केले होते. यात कल्याणमधील सापर्डे आणि अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावांतील बैल सहभागी झाले होते.
झुंज लागली असताना तरुणांनी बैलांच्या अवतीभोवती आरडाओरडा करत अक्षरश: धिंगाणा घातला होता. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. झुंज आणि ती बघण्यासाठी तरुणांची लोटलेली गर्दी याची कोणतीही कुणकुण स्थानिक मानपाडा पोलिसांना रविवारी लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या झुंजीचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा नोंद केला.
सुरक्षेची कुठलीही उपाययोजना नाही
झुंजीच्या वेळेस बैलांना क्रूरतेची वागणूक दिली. तसेच नागरिकांसाठी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केली नव्हती. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिली.