चालकांत रंगला भाड्यावरून वाद, मृतदेह ३ तास शवागारात; तेलंगणातील बांधकाम मजुराचे मृत्युनंतरही हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:24 IST2025-07-16T09:24:30+5:302025-07-16T09:24:54+5:30
रुग्णवाहिका चालक शेख म्हणाला, कल्याण ते तेलंगणा हे अंतर जास्त असल्याने २५ हजार रुपये भाडे सांगितले. कोणत्याही रुग्णाची अडवणूक केलेली नाही.

चालकांत रंगला भाड्यावरून वाद, मृतदेह ३ तास शवागारात; तेलंगणातील बांधकाम मजुराचे मृत्युनंतरही हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातून तेलंगणाला एका मजुराचा मृतदेह नेण्यासाठी दोन खासगी रुग्णवाहिका चालकांमध्ये भाडे आकारणीवरून वाद सुरू झाल्याने मृतदेह शवागारात तीन तास पडून हाेता.
करीया बिच्चप्पा मजुराचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात नेला. मंगळवारी नातेवाइकांनी मृतदेह अंत्यविधीकरिता तेलंगणाला नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडे भाड्याची विचारणा केली. रुग्णालयाबाहेरील रुग्णवाहिका चालक रोशन शेख याने २५ हजार रुपये भाडे सांगितले. मजुराच्या नातेवाइकांनी भाड्याचे पैसे कमी करण्याची विनंती केली. त्याने नकार दिला. दुसरा खासगी रुग्णवाहिका चालक समीर मेमन याने १५ हजार रुपये भाडे सांगितले. मात्र पहिल्या चालकाने १५ हजार रुपये भाडे घेण्यास मज्जाव केला. त्यावरून त्या दोघांमध्ये तीन तास वाद सुरू होता. तेवढा वेळ मजुराचा मृतदेह शवागारात पडून होता.
... आणि महिलेच्या जिवावर बेतले; पाच जण निलंबित
काही महिन्यांपूर्वी एका महिलेला रुक्मिणीबाई रुग्णालयातून उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलविण्यात यावे, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यावेळी रुग्णवाहिका चालकाने एक हजार रुपये भाडे सांगितले होते. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. रुग्णवाहिका चालकासह पाच जणांच्या विरोधात महापालिकेने निलंबनाची कारवाई केली होती.
रुग्णवाहिका चालक शेख म्हणाला, कल्याण ते तेलंगणा हे अंतर जास्त असल्याने २५ हजार रुपये भाडे सांगितले. कोणत्याही रुग्णाची अडवणूक केलेली नाही.
या प्रकाराची माहिती पालिका प्रशासनाने घेतली आहे. खासगी रुग्णवाहिकांनी सामान्यांना परवडणारे भाडे आकारावे. त्याचे दर आरटीओकडून निश्चित करण्यात यावेत, अशी सूचना आरटीओ कार्यालयाला महापालिका करणार आहे.
हर्षल गायकवाड,
अतिरिक्त आयुक्त, कंडोमपा