भाजपच्या ‘रात्रीस पक्षप्रवेश चाले’ची ‘केडीएमसी’त चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:44 IST2025-12-23T09:44:13+5:302025-12-23T09:44:30+5:30
उल्हासनगरचे ओमी कलानी टीमचे पदाधिकारी राजेश टेकचंदानी यांना रविवारी रात्री उशिरा त्यांच्या घरी जाऊन भाजपमध्ये प्रवेश दिला.

भाजपच्या ‘रात्रीस पक्षप्रवेश चाले’ची ‘केडीएमसी’त चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एकमेकांचे मोहरे पक्षात घेण्यावरून शिंदेसेना व भाजपमध्ये ताणाताणी झाल्यानंतर आता भाजपने मनसे व अन्य पक्षांतील नेत्यांना रात्री-अपरात्री घरी जाऊन आपल्या पक्षात घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगरचे ओमी कलानी टीमचे पदाधिकारी राजेश टेकचंदानी यांना रविवारी रात्री उशिरा त्यांच्या घरी जाऊन भाजपमध्ये प्रवेश दिला. डोंबिवलीतील मनसेच्या माजी नगरसेविका मंदा म्हात्रेंकडे, तर चव्हाण मध्यरात्री गेले व कुटुंबीयांशी चर्चा करून प्रवेश दिला. भाजपच्या ‘रात्रीस पक्षप्रवेश चाले’ची कल्याण डोंबिवलीत जोरदार चर्चा आहे.
उल्हासनगरमध्ये पॅनल क्रमांक ६ मधील माजी नगरसेविका सरोजिनी टेकचंदानी या आजारी असल्याचे समजताच चव्हाण यांनी त्यांच्या रिजन्सी इंटेलिया येथील घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. त्या गेले काही दिवस रुग्णालयात उपचार घेत होत्या. चव्हाण यांनी आस्थेने विचारपूस केल्याचे समाधान व्यक्त करत त्यांनी थेट पक्षात प्रवेश केला. शनिवारी मध्यरात्री अशाच प्रकारे दिवसभराच्या कार्यक्रमानंतर डोंबिवलीमध्ये येऊन त्यांनी मनसेच्या माजी नगरसेविका मंदा म्हात्रे, त्यांचे दीर संतोष म्हात्रेंना पक्षात घेतले.
ओमी टीम समर्थक माजी नगरसेवक सरोजनी टेकचंदानी यांनी मुलगा राजेश टेकचंदानी याच्यासह रविवारी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टेकचंदानी यांच्या घरी जाऊन हा पक्ष प्रवेश घडवून आणला. यावेळी चव्हाण यांनी सरोजनी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.