नवी मुंबईत महापौर भाजपचा होईल - संजीव नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:05 IST2021-02-03T01:04:50+5:302021-02-03T01:05:46+5:30
Politics News : केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्याचे विरोधकांचे काम राहिले आहे. तुम्ही नगरसेवक फोडू शकता; परंतु जनतेला फोडू शकत नाही.

नवी मुंबईत महापौर भाजपचा होईल - संजीव नाईक
डोंबिवली : केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्याचे विरोधकांचे काम राहिले आहे. तुम्ही नगरसेवक फोडू शकता; परंतु जनतेला फोडू शकत नाही. जनतेने गणेश नाईक या व्यक्तिमत्त्वावर २५ वर्षे विश्वास ठेवला आहे. नवी मुंबई मनपाच्या येत्या निवडणुकीतही गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचाच महापौर विराजमान होईल, असे मत माजी खासदार संजीव नाईक यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.
भाजप कल्याण जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे कार्यकर्ता मेळावा सोमवारी निळजे पलावा येथे झाला. त्यावेळी नाईक बोलत होते. याप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली महिला अध्यक्ष पूनम पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवी मुंबई मनपाची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असे राजकीय वातावरण तेथे तापू लागले आहे. याविषयी नाईक म्हणाले, ‘जात, धर्म, वर्ण यापलीकडे जाऊन नवी मुंबईचा विकास गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी केला आहे.
प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या अगोदर काही सहकारी मला सोडून दुसऱ्या पक्षात जातात, परंतु नेतृत्व हे नाईक यांच्याकडेच राहिलेले आहे. आताही तेथे भाजपचाच महापौर होईल. नाईक विरुद्ध सर्वपक्षीय अशीच नवी मुंबईची निवडणूक होईल.’ ते पुढे म्हणाले, ‘भाजप मनसेसोबत युती करणार का, याविषयी पक्ष योग्य तो निर्णय घेईल.’