बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या कामाला लवकरच मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कल्याण - डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 13:53 IST2024-03-04T13:51:43+5:302024-03-04T13:53:03+5:30
कल्याण-शीळ राेडजवळ असलेल्या कोळेगावातील प्रीमियर ग्राऊंडवर रविवारी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले होते.

बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रोच्या कामाला लवकरच मुहूर्त; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, कल्याण - डोंबिवलीत ‘शासन आपल्या दारी’
कल्याण : १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट केली, कल्याण-शीळ रस्ते बाधितांच्या मोबदल्याचा निर्णय लवकर घेऊन त्यांना मोबदला दिला जाणार आहे, बदलापूर- कांजूरमार्ग मेट्रोचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कल्याण-शीळ राेडजवळ असलेल्या कोळेगावातील प्रीमियर ग्राऊंडवर रविवारी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी शिंदे बाेलत हाेते. पुढे ते म्हणाले, फेसबुक लाइव्ह करून सरकार चालविता येते नाही. तळागाळात जाऊन काम करावे लागते. शेतात साचलेला चिखल तुडवत पाहणी करावी लागते. घरात बसून ते काम होत नाही. आमचे सरकार लोकाभिमुख आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून सरकारमधील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी हा लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. याआधीच्या सरकारमध्ये निर्णय घेण्याचे धाडस नव्हते. दिलेला शब्द पाळावा लागतो. दिलेला शब्द पाळण्याचे धाडस आमच्या सरकारने दाखविले आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
या कामांचे केले भूमिपूजन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डोंबिवलीतील सूतिकागृह आणि कर्कराेग रुग्णालय, डोंबिवली पश्चिमेतील फिश मार्केट आणि कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले तेव्हा उपस्थितांनी मोबाइल टॉर्च लावून त्यांचे जोरदार स्वागत केले.
सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारे सरकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ता काळात देशभरातील गरिबी हटवण्याचे काम खऱ्या अर्थाने झाल्याचे या प्रसंगी एकनाथ शिंदे सांगितले.
आधीचे महाविकास आघाडीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे सरकार होते.
आमचे सरकार हे सर्वसामन्यांचे अश्रू पुसणारे आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.