'नो चलान डे'च्या माध्यमातून कल्याणात ट्रॅफिक पोलिसांची जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 14:09 IST2021-12-30T14:07:48+5:302021-12-30T14:09:08+5:30
केंद्र सरकारने काही आठवड्यांपूर्वी वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे.

'नो चलान डे'च्या माध्यमातून कल्याणात ट्रॅफिक पोलिसांची जनजागृती
कल्याण: वाहतुकीच्या नविन कायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासह ते पाळण्याचे आवाहन करण्यासाठी कल्याण ट्रॅफिक पोलिसांतर्फे 'नो चलान डे' उपक्रम राबविण्यात आला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना यावेळी गुलाब पुष्प आणि नव्या वाहतूक नियमांचे पत्रक वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले.
केंद्र सरकारने काही आठवड्यांपूर्वी वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी काही शेमध्ये असणारा दंड आता हजारांच्या घरात पोहचला आहे. त्याजोडीला न्यायालयीन शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती कल्याण ट्रॅफिक एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी दिली. तसेच आज कल्याण स्टेशन परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना थांबवून वाहतुक पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. तसेच 'नो चलान डे' हा केवळ आजच्या दिवसापूरता मर्यादित असून वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर उद्यापासून पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू केली जाणार असल्याचा इशाराही वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी यावेळी दिला.