"जामीन झाला नाही तर एके-४७ घेऊन येतो"; हत्या झालेल्या पीडित मुलीच्या घराबाहेर तरुणाने दिली धमकी

By मुरलीधर भवार | Updated: February 3, 2025 18:35 IST2025-02-03T18:34:17+5:302025-02-03T18:35:23+5:30

कल्याणमध्ये अत्याचार करुन हत्या केलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना धमकावण्याचा प्रयत्न झाला आहे.

Attempt to threaten the family of the girl who was raped and murdered in Kalyan | "जामीन झाला नाही तर एके-४७ घेऊन येतो"; हत्या झालेल्या पीडित मुलीच्या घराबाहेर तरुणाने दिली धमकी

"जामीन झाला नाही तर एके-४७ घेऊन येतो"; हत्या झालेल्या पीडित मुलीच्या घराबाहेर तरुणाने दिली धमकी

Kalyan Rape and Murder Case:कल्याणमधून अतिशय संतापजनक अशी घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणारा आरोपी विशाल गवळी हा न्यायालयीन कोठडीत आहे. विशाल गवळीच्या तीन भावांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. असं असतानाच मध्यरात्री पीडित मुलीच्या घराबाहेर तीन तरुणांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तिघेही विशाल गवळीचे समर्थक असल्याचे म्हटलं जात आहे. यावेळी पीडितेच्या घराबाहेर दहशत माजवणाऱ्या तरुणांनी जामीन झाला नाही तर एके-४७ घेऊन येतो अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचे समोर आलं आहे. हा सगळा एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पीडितेच्या कुटुंबियांना पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

कल्याण पूर्वेमधील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांना अटक करण्यात आली. विशाल गवळीने मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली आणि साक्षीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात त्याला मदत केली होती. बुलढाण्याला पळून गेलेल्या पोलिसांनी विशालला शिताफीने अटक केली होती. मात्र आता त्याच्या समर्थकांकडून दहशत माजवण्यात येत आहे.रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तीन तरुणांनी पीडित मुलीच्या घराबाहेर जात शिवीगाळ केल्याचे समोर आलं आहे. यातील एकाने जामीन झाला नाही तर एके-४७ घेऊन येतो अशी धमकी देखील दिली आहे. यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनी  कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

कल्याण पूर्व भागात गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी आरोपी विशाल गवळीने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन हत्या केली होती. यानंतर विशाल गवळी फरार झाला होता. विशालने त्याच्या पत्नीसह मिळून मुलीचा मृतदेह मृतदेह बापगाव परिसरात फेकला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात विशाल आणि त्याच्या पत्नीला अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपी गवळीच्या तीन भावांना पोलिसांनी तडीपार केले आहे. मात्र असं असलं तरी तिघांनी पीडितेच्या घराशेजारी जाऊन दहशत माजवली. आरडाओरड करुन शिवीगाळ करत जामीन झाला नाही तर एके-४७ घेऊन येतो अशी धमकी दिली आहे. त्यामुळे आता पीडितेचे कुटुंबिय दहशती खाली आहेत.

दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र आता पोलीस बंदोबस्त नाही. आम्हाला पुरेसा पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. आरोपी गवळीच्या तीन भावांच्या विरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली असली तरी त्याचे दोन भाऊ परिसरात फिरत असल्याचे म्हटलं जात आहे.

Web Title: Attempt to threaten the family of the girl who was raped and murdered in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.