पोटाची खळगी भरण्यासाठी 'त्यांना' करावी लागते जीवघेणी कसरत; PHOTO पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 18:51 IST2022-01-24T18:46:47+5:302022-01-24T18:51:03+5:30
आता या गावकऱ्यांची समस्या कधी मार्गी लागेल? प्रशासन लोकप्रतिनिधी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पुढाकार घेतात का? हे पहावे लागेल.

पोटाची खळगी भरण्यासाठी 'त्यांना' करावी लागते जीवघेणी कसरत; PHOTO पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल!
कल्याण- एकीकडे आपण स्मार्ट सिटी आणि डिजिटल इंडियाच्या गप्पा करत आहोत. इतकंच नाही तर लवकरच आपण 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. एकीकडे कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे या शहरांत मोठमोठे प्रकल्प होऊ घातले आहेत. मात्र या शहरांपासून जवळच असलेल्या कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या आपटी गावातील नागरिक आजही मरण यातना भोगत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास पाहून तुमच्याही अंगवार शहारा येईल.
लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला या नदीवरून टाकण्यात आलेल्या लोखंडी खांबावरून पायी चालतात. थोडा जरी तोल चुकला तरी थेट उल्हास नदीत पडून वाहून जाण्याची भिती या गावकऱ्यांना असते. मात्र ही टांगती तलवार असतानाही नाईलाजाने हा प्रवास ग्रामस्थांना करावाच लागतो.
आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा या गावात पहिले शेती केली जायची मात्र त्यानंतर आजूबाजूला एमआयडीसी झाल्याने रोजगारासाठी ग्रामस्थ बाहेर पडू लागले.
वाढणारी लोकसंख्या आणि नव्याने वसलेली शहरे यांना पाणी पुरवठा कमी पडू लागल्याने एमआयडीसी ने या आपटी बंधाऱ्याच्या उंची वाढविली, तसेच बंधाऱ्याच्या खाली आपटी जांभूळ वसद, आदी गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी एक ते दिड मीटर रुंदीची साधारण ५०० मीटर लांबीची पायवाट तयार करून देण्यात आली होती. ये जा करण्यासाठी ग्रामस्थ हा रस्ता वापरत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात पायवाटेचा काही भाग वाहून गेला. यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना उल्हास नदीवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.दुस-या मार्गाने जायचे असेल तर 20 ते 25 किलोमीटर लांबून वळसा मारावा लागतो. एकीकडे उपासमार टाळण्यासाठी हा भयंकर प्रवास करावा लागतो तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने 25 किमी लांबच्या पल्ल्याहून प्रवास करणे परवडेनासे झाले आहे.
यामुळे आता या गावकऱ्यांची समस्या कधी मार्गी लागेल? प्रशासन लोकप्रतिनिधी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पुढाकार घेतात का? हे पहावे लागेल.