...अन् बुटांवरील रक्ताच्या डागाने बळावला संशय; अत्याचार, हत्या करणारा विशाल गवळी रात्रभर होता घरातच
By सचिन सागरे | Updated: December 30, 2024 12:56 IST2024-12-30T12:55:23+5:302024-12-30T12:56:23+5:30
२२ डिसेंबरला कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून १३ किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह पोलिसांना आढळला.

...अन् बुटांवरील रक्ताच्या डागाने बळावला संशय; अत्याचार, हत्या करणारा विशाल गवळी रात्रभर होता घरातच
सचिन सागरे -
कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करणारा विशाल गवळी दुष्कृत्यानंतर रात्रभर घरातच होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि घराबाहेर असलेल्या बुटांवर पडलेल्या रक्ताच्या डागांमुळे त्याच्यावरील संशय बळावला आणि पोलिसांनी माग घेत शेगावला त्याला बेड्या ठोकल्या.
२२ डिसेंबरला कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून १३ किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह पोलिसांना आढळला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची सहा पथके सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत होती.
ज्या परिसरात मुलगी राहत होती तेथील सीसीटीव्हीमध्ये ती परिसराच्या बाहेर पडल्याचे दिसून आले नाही. त्या अनुषंगाने पोलिसांनी आसपासच्या घरांमध्ये शोध घेतला. यादरम्यान, एका घराबाहेर ठेवलेल्या बुटांवर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. ज्या घराबाहेर हे बूट होते ते घर विशालचे असल्याचे समोर आले.
नातेवाइकांकडे राहायला गेला
घटनेच्या दिवशी रात्रभर पत्नीसोबत घरात असलेला विशाल दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे साक्षीला बँकेत सोडायला गेला. तेथून तो एका जवळच्या नातेवाइकांकडे दोन-तीन दिवस राहायला जाण्याच्या उद्देशाने निघून गेला.
डोंबिवली-ठाणे आणि शेगाव
- नातेवाइकांकडे गेलेल्या विशालला पोलिस मागावर असल्याची कुणकुण लागताच त्याने तिथून पोबारा करत रिक्षाने डोंबिवली रेल्वे स्टेशन गाठले.
- तेथून लोकलने ठाण्याच्या दिशेने गेला. संध्याकाळी ठाणे स्टेशनवरून एक्स्प्रेस पकडून शेगावला गेला. प्रवासादरम्यान तो प्रवाशांकडून मोबाइल घेत नातेवाइकांशी संपर्क करत होता.
शेगावमध्ये लॉजवर थांबला
शेगावला गेलेला विशाल पत्नी साक्षीच्या माहेरी न जाता लॉजवर थांबला. तेथूनही त्याने प्रकरणाची माहिती घेतली.
विशाल लॉजवर थांबल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरिष्ठांना विशालबाबत माहिती देत शेगाव पोलिसांना लॉजवर धडक देण्यास सांगितले.
मात्र, तेथे विशाल आढळला नाही. त्यानंतर जवळील एका सलूनमध्ये दाढी करायला बसलेल्या विशालच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
पती मारेल या भीतीने केले सहकार्य
- घटनेच्या दिवशी, जवळच्या नातेवाइकाचे निधन झाल्याने विशालचे आई-वडील आणि भाऊ हे तिघे तिकडे गेले होते. तर पत्नी साक्षी कामाला गेली होती.
- त्या दिवशी घरात एकटाच असल्याची संधी साधत विशाल पीडितेला फूस लावून घरी घेऊन गेला आणि हे दुष्कृत्य केले. पती मारेल या भीतीने साक्षीने त्याला सहकार्य केले आणि तिच्याच खुलाशामुळे हा प्रकार समोर आला.