इमारत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुर्घटना; स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेकडे नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:04 IST2025-05-21T15:03:44+5:302025-05-21T15:04:31+5:30
तळ अधिक चार मजली इमारत २००१ मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत ५० कुटुंबे राहत होती...

इमारत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुर्घटना; स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेकडे नाही
कल्याण : सप्तशृंगी धोकादायक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यासाठी मालकाने महापालिकेची परवानगी घेतली होती किंवा नाही, हे स्पष्ट नाही. दरम्यान, या इमारत दुरुरस्तीचे काम करणाऱ्यावर रात्री उशिरा कोळसेवाडी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तळ अधिक चार मजली इमारत २००१ मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत ५० कुटुंबे राहत होती. रहिवासी जयश्री क्षीरसागर यांनी सांगितले की, त्या दुसऱ्या मजल्यावर दोन वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहतात. आता त्यांच्यावर घराकरिता शोधाशोध करण्याची वेळी आली. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची नोटीस सहायक आयुक्त सचिन तामखेडे यांनी बजावली होती. ऑडिट केले की नाही, याची माहिती पालिकेकडे नाही.
काम कशाच्या आधारे?
पावसाळा आल्यावर ज्याप्रमाणे धोकादायक इमारतींना पालिका नोटिसा बजावते त्याप्रमाणे या इमारतीला नाेटीस बजावण्याची औपचारिकता पूर्ण केली होती. इमारत इतकी धोकादायक झाली होती, तर ती कोसळून जीवितहानी होण्याची पालिका वाट पाहत होते का, असा सवाल नागरिकांनी केला. इमारतीमधील दुरुस्तीच्या कामाला पालिकेने परवानगी दिली नव्हती; तर ते कशाच्या आधारे केले जात होते, असा प्रश्न उपस्थित झाला.
इमारत पाडावी लागणार
या इमारतीच्या अवतीभवती चाळी आहेत. इमारत पाडण्यासाठी पालिकेस मंगळवारी रात्री उशिरा कारवाई करणे शक्य नाही. मात्र, ही इमारत पाडावी लागणार आहे. या इमारतीच्या शेजारी असलेल्या चाळीतील नागरिकांना नूतन विद्यालय शाळेत सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
संक्रमण शिबिरे कुठे?
कल्याण-डोंबिवलीत धोकादायक इमारती आहेत. पावसाळ्यात त्या कोसळण्याची भीती असते. अशा इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्यांचे स्थलांतर करण्यासाठी पालिकेकडे संक्रमण शिबिरे उभारलेली नाही. अशा परिस्थितीत नागरिकांना शाळेत हलविण्याची वेळ येते. नागरिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना त्यांना शाळेत न ठेवता त्यांच्या राहण्याची चांगल्या ठिकाणी व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी भरत सोनावणे यांनीही हीच मागणी केली.
इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस बजावली हाेती. इमारतीत स्लॅबची दुरुस्ती सुरू असताना ही घटना घडली.
अभिनव गोयल, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका