उल्हासनगर मतदार यादीत महाराष्ट्र नावाची महिला? प्रभाग क्रं-१९ मधील यादीतील घोळ उघड
By सदानंद नाईक | Updated: November 27, 2025 19:38 IST2025-11-27T19:38:31+5:302025-11-27T19:38:46+5:30
उल्हासनगर महापालिकेने प्रारूप मतदार याद्या घोषित केल्या, तेंव्हापासून मतदार याद्यात घोळ झाल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत.

उल्हासनगर मतदार यादीत महाराष्ट्र नावाची महिला? प्रभाग क्रं-१९ मधील यादीतील घोळ उघड
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका प्रभाग क्रं-१९ मधील यादी क्रं-३२४ मध्ये अनुक्रमांक-२१, ७५९ मध्ये मतदाराचे नाव महाराष्ट्र व पतीचे नावही महाराष्ट्र दाखविले. महाराष्ट्र मतदारावरून मतदार यादीतील घोळ उघड झाल्याची टिका उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी केली.
उल्हासनगर महापालिकेने प्रारूप मतदार याद्या घोषित केल्या, तेंव्हापासून मतदार याद्यात घोळ झाल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत. बुधवारी प्रारूप मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेऊन तसे निवेदन दिले. प्रभाग क्रं-१९ मधील मतदार यादीत शिवमंदिर परिसरातील मतदार यादी क्रं-३२४ मध्ये चक्क महाराष्ट्र नावाची ५७ वर्षीय महिला घर क्रं-२०२ मध्ये राहत असल्याचे दाखविले. तसेच तीच्या पतीचे नाव महाराष्ट्र असून आडनाव दाखविले नाही. अशी बोगस नावे मतदार यादीत घुसविले असून दुबारा मतदारांची संख्या मोठी आहे. असा आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे व मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमूख यांनी केला. हरकती घेण्यात विरोधी पक्षाचे पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी काही प्रमाणात मौनवृत धारण केल्याची टिका होत आहे.
महापालिका प्रभाग यादी क्रं-१९ मध्ये महाराष्ट्र नावाची महिला मिळून आली असून निवडणूक आयोगाने ही महिला दाखवावी. अशी चुकीचे नावे जाणीवपूर्वक घुसविण्यात आली असून याचा भांडाफोड करण्याची गरज निर्माण झाल्याचे बोडारे म्हणाले. आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी मतदार यादीची तपासणी करीत असून बहुतांश प्रभागातील नावे इतर प्रभागात टाकण्यात आली. अश्या मतदारांची संख्या १ ते ३ हजाराच्या घरात आहे. संपूर्णच मतदार यादी दुसऱ्या प्रभागात फिराविण्याची किमया निवडणूक आयोगाने गुप्त शक्तीच्या माध्यमातून केली असावी, असा आरोपही बोडारे यांनी केला. या निवडणुकीत अश्या चालकीचे भांडफोड करण्याचा इशाराही त्यानी दिला. प्रभाग क्रं-१९ व २० मध्ये अंबरनाथ पालेगावची ५०० पेक्षा जास्त नावे आल्याचा आरोप समाजसेवक प्रशांत चंदनशिव यांनी करून त्यावर हरकत घेतली आहे.