विचित्र दुर्घटना! शौचालयातील भांड्यासह गर्भवती पडली टाकीत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:29 AM2022-08-05T07:29:47+5:302022-08-05T07:29:59+5:30

स्थानिक महिलांनी केडीएमसीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिलांनी सांगितले की, शौचालयाच्या दुरवस्थेबाबत वारंवार मनपाकडे तक्रारी करूनही त्यांच्याकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ही घटना घडली.

A pregnant woman fell into a tank with a toilet bowl; Lives were saved due to vigilance of citizens | विचित्र दुर्घटना! शौचालयातील भांड्यासह गर्भवती पडली टाकीत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

विचित्र दुर्घटना! शौचालयातील भांड्यासह गर्भवती पडली टाकीत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : सार्वजनिक शौचालयात गेलेली गर्भवती महिला भांड्यासह टाकीत पडल्याची घटना मोहने येथील लहुजी नगरात बुधवारी पहाटे घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा प्राण वाचला आहे. टाकीत पडलेल्या महिलेस नागरिकांनी बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मनपाने दुर्घटनाग्रस्त शौचालय नागरिकांच्या वापरासाठी बंद केले आहे. तेथे पर्यायी शौचालयाची व्यवस्था केल्याची माहिती दिली आहे. 

लहुजी नगरात राहणारी उमा रिठे (वय २२) ही गर्भवती महिला बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास शौचालयात गेली होती. त्यावेळी ती शौचालयाच्या भांड्यासह शौचालयाच्या टाकीत पडली. ती टाकीत पडताच तिने बचावासाठी आरडाओरडा केला. तेव्हा नागरिकांनी शौचालयाच्या दिशेने धाव घेतली. तिला तातडीने टाकीच्या बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. ज्या शौचालयात ही घटना घडली, ते २० वर्ष जुने असून, त्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे.

या प्रकारामुळे स्थानिक महिलांनी केडीएमसीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिलांनी सांगितले की, शौचालयाच्या दुरवस्थेबाबत वारंवार मनपाकडे तक्रारी करूनही त्यांच्याकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ही घटना घडली. महिला बचावली नसती तर तिच्यासह तिचे बाळ हे टाकीत गुदमरून जिवानिशी गेले असते. सामान्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास मनपास वेळ नाही. स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवून काय उपयोग? आधी सार्वजनिक शौचालये नीट करा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

 नवीन शौचालय उभारण्याचा प्रस्ताव 
या संदर्भात प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते म्हणाले की, दुर्घटनाग्रस्त शौचालये नागरिकांच्या वापरासाठी बंद केली आहेत. नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल शौचालयाची व्यवस्था केली आहे. घटनास्थळी जल-मल निस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनीही भेट दिली. शौचालय नव्याने बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, जागा एनआरसी कंपनीची असून, ती आता अदानी उद्योग समूहाच्या मालकीची आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जागा देण्याची मागणी मनपाने केली आहे. 

Web Title: A pregnant woman fell into a tank with a toilet bowl; Lives were saved due to vigilance of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.