लेदर पट्टे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
By प्रशांत माने | Updated: February 24, 2023 22:00 IST2023-02-24T21:59:17+5:302023-02-24T22:00:05+5:30
शुक्रवार असल्याने कंपनी बंद होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लेदर पट्टे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
डोंबिवली : येथील एमआयडीसी, सोनारपाडा परिसरातील लेदर पट्टे आणि बॅग बनविणाऱ्या ट्रेगस नामक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली. शुक्रवार असल्याने कंपनी बंद होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, या भीषण आगीत कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच डोंबिवली आणि पलावा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीची भीषणता पाहता आणखी चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी मागविण्यात आल्या. दरम्यान, पाऊण तासाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.