खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सवासाठी ३५० बस रवाना
By मुरलीधर भवार | Updated: August 30, 2022 23:20 IST2022-08-30T23:17:06+5:302022-08-30T23:20:22+5:30
कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कळवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील सुमारे 15 हजार चाकरमानी आणि प्रवाशांना याचा थेट फायदा झाला.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सवासाठी ३५० बस रवाना
डोंबिवली : दोन वर्ष करोना प्रतिबंधामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य चाकारमान्यांना यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोकण, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तब्बल ३५० मोफत बस उपलब्ध करून दिल्या होत्या. रविवारी खासदार शिंदे यांनी या बसेसला भगवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कळवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील सुमारे 15 हजार चाकरमानी आणि प्रवाशांना याचा थेट फायदा झाला.
गणेशोत्सवाकरिता कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांसाठी रविवारी सायंकाळी डोंबिवली पश्चिमेतून मोफत एसटी बस सोडण्यात आल्या. शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या प्रभागातील श्री कार्यालय येथून बसगाड्यांना खासदार शिंदे यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखविण्यात आला. याप्रसंगी खासदार शिंदे बाेलत हाेते. यावेळी राजेश कदम, राजेश मोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कल्याण पूर्वेतील ड प्रभाग कार्यालयातून मोफत बसगाड्या सोडण्यात आल्या. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रशांत काळे, नीलेश शिंदे, विशाल पावशे, माधुरी काळे, अरुण आशान, आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याण-मालवण या गाडीला प्रथम सोडण्यात आले. त्याचबरोबर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयाच्या येथूनही खासदारांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून बस सोडण्यात आल्या.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चाकरमान्यांनी या बसचा आधार घेतला. पी. सावळाराम क्रीडा संकुलात या बस मार्गस्थ करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे स्वतः उपस्थित होते. याप्रसंगी या बसचे सारथ्य करणाऱ्या बस चालक आणि वाहकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. खासदार शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना लवकरच मार्गी लावले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. शिवसेना कोकणवासी यांच्या कायमच पाठी उभी राहिली आहे.