मालमत्ता कर थकविल्याने महेक सोसायटीतील १७ गाळे सील
By मुरलीधर भवार | Updated: February 15, 2025 14:59 IST2025-02-15T14:58:35+5:302025-02-15T14:59:42+5:30
१ कोटी २६ लाख रुपयांचा कर थकविला; केडीएमसीची कारवाई, कारवाईस नागरीकांचा विरोध

मालमत्ता कर थकविल्याने महेक सोसायटीतील १७ गाळे सील
मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण-कल्याण मलंग रोड परिसरातील नांदिवली भागात असलेल्या महेक सोसायटीमधील गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी मालमत्ता कर थकविल्याने महापालिकेच्या ९ आय प्रभागाच्या कारवाई पथको सोसायटीतील १७ व्यापारी गाळे सील करण्याची धडक कारवाई केली. या कारवाईस इमारतीच्या मालकाने कडाडून विरोध केला. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे .
नांदिवली परिसराती महेक सोसायटीमधील गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर थकविला आहे. मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या ९ आय प्रभाग कार्यालयाने सदनिकाधारक आणि गाळेधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेने बजावलेल्या नोटिसा सदनिकाधारक घेत नाहीत. तसेच गाळेधारकांच्या दुकानावर नोटिसा लावण्यात आल्या होत्या. महापलिकेने लावलेल्या कारवाईच्या नोटिसा गाळेधारक आणि सदनिकाधारकांना फाडून टाकल्या होत्या. अखेरीस आज महापालिकेच्या ९ आय प्रभागाचे सहाय्यक भारत पवार यांच्या आदेशानुसार अधीक्षक भास्कर रेरा, सुधीर पालणकर, गणेश वायले यांचे कारवाई पथक महेक सोसायटीत पोहचले. कारवाई दरम्यान पाेलिस ही उपस्थित होते. यावेळी कारवाईस सदनिकाधारकांनी विरोध केला. मात्र महापालिकेच्या कारवाई १७ गाळे सील करण्याची कारवाई केली आहे.
सहाय्यक आयुक्त पवार यांनी सांगितले की, २०१५ साली महापालिकेत २७ गावे समाविष्ट करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत २७ गावात १७ गाळे इतक्या मोठ्या मालमत्ता कराच्या थकबाकी रक्कमेपोटी सील करण्याची ही पहिली मोठी कारवाई कारवाई आहे.
या संदर्भात इमारतीचे मालक द्वारकादास वाधवा यांनी सांगितले की, आमचा या कारवाईस तीव्र विरोध आहे. महापालिकेने बजावलेल्या नोटिसानुसार आमच्या मालमत्तांना ५० टक्के व्याज आकारले आहे. २७ गावात आमची इमारतीत घरे सेल करण्याची परवानगी दिली नाही. शेजारच्या इमारतीली घरे सेल केली जात आहे. हा दुजाभाव आहे. घरे सेल झाली तर त्यातून आलेलेल्या पैशातून आम्ही मालमत्ता कर भरु शकतो.