१० जणांनी कर न भरल्याची शिक्षा तब्बल १०२ जणांना; पाणीपुरवठा खंडित, रहिवासी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:35 IST2026-03-24T11:35:36+5:302026-03-24T11:35:36+5:30
या सक्तीच्या कारवाई विरोधात रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

१० जणांनी कर न भरल्याची शिक्षा तब्बल १०२ जणांना; पाणीपुरवठा खंडित, रहिवासी संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेने मालमत्ता कराची वसुली सुरु केली आहे. कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सागर या इमारतीमधील ११२ सदनिकाधारकांपैकी १० जणांनी मालमत्ता कर भरलेला नाही. त्याची शिक्षा १०२ रहिवाशांना भोगावी लागली आहे. ‘क’ प्रभाग कार्यालयाने इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. या सक्तीच्या कारवाई विरोधात रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
रहिवासी अशरफ शेख यांनी सांगितले की, ९० टक्के रहिवाशांनी त्यांचा मालमत्ता कर भरला आहे. १० टक्के जणांनी कर भरलेला नाही. त्याची शिक्षा आम्हाला का ? असा संतप्त सवाल केला आहे. पालिकेने इमारतीचा पाणीपुरवठा बंद करताना रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही.
बँका बंद असल्यामुळे कर भरता आला नाही
सलग सुट्ट्यांमुळे बँका बंद होत्या. त्यामुळे काही रहिवाशांना तत्काळ कर भरणे शक्य नव्हते. तरीही अधिकाऱ्यांनी कोणतीही मुभा न देता पाणीपुरवठा बंद केला. रहिवाशांनी सांगितले की, आम्ही नियमित कर भरताे.
तरी आम्हाला अशी वागणूक प्रशासनाकडून देण्यात आली. पाणीपुरवठा खंडित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही रास्ता रोको करू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.