कबड्डी : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 21:29 IST2018-06-22T21:29:10+5:302018-06-22T21:29:38+5:30
भारताच्या कबड्डी संघाने दुबई मास्टर्स स्पर्धेत पाकिस्तानवर 36-20 असा दणदणीत विजय मिळवला आहे.

कबड्डी : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
दुबई : भारताच्या कबड्डी संघाने दुबई मास्टर्स स्पर्धेत पाकिस्तानवर 36-20 असा दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात पहिल्या सत्रापासून भारताने सामन्यावर पकड मजबूत केली होती. दुसऱ्या सत्रातही लौकिकाला साजेसा खेळ करत भारतीय संघाने विजयाला गवसणी घातली.
या स्पर्धेत भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असे बऱ्याच चाहत्यांनी म्हटले होते. पाकिस्तानबरोबरच्या तणावपूर्ण संबंधांमुळे कोणतेही क्रीडा सामने खेळवायचे नाहीत, असे काही भारताच्या क्रीडा प्रेमींचे म्हणणे होते. पण अखेर भारतीय संघ या स्पर्धेसाठी दुबईमध्ये दाखल झाला आणि त्यांनी पाकिस्तानला नमवले.
पहिल्या सत्रात खोल चढाया आणि दमदार बचाव करत भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंना हतबल करून सोडले. पहिल्या सत्रात भारताने 22-9 अशी दमदार आघाडी घेतली होती. त्यामुळे दुसऱ्या सत्रात पाकिस्तानचा संघ दमदार पुनरागमन करेल, असे वाटत होते. पण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघाला वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही आणि सामना 36-20 अशा फरकाने जिंकला.