गोवा कबड्डीतील चेहरा आंतरराष्ट्रीय स्तरावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 20:58 IST2018-06-15T20:58:51+5:302018-06-15T20:58:51+5:30
दुबईतील कबड्डी मास्टर्ससाठी टेक्निकल आॅफिसर म्हणून प्रज्योतची निवड : भारताचा पाकविरुद्ध सामना

गोवा कबड्डीतील चेहरा आंतरराष्ट्रीय स्तरावर!
सचिन कोरडे : एक खेळाडू म्हणून नव्हे तर तांत्रिक अधिकारी म्हणून गोव्याचा कबड्डीतील चेहरा प्रज्योत मोरजकर आता अनेकांच्या लक्षात आहे. प्रो कबड्डी स्पर्धेत शानदार योगदान देणाऱ्या या अधिकाऱ्याची आता दुबईतील कबड्डी मास्टर्स-२०१८ या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. देशातील दहा तांत्रिक अधिकाऱ्यामध्ये गोव्याच्या प्रज्योतचा समावेश आहे. अल वस्ल इनडोअर स्टेडियम, दुबई (यूएई) येथे २२ ते ३० जून दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी २० जून रोजी प्रज्योत दिल्लीहून रवाना होईल. स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन आॅफ इंडियायांनी गोवा कबड्डी संघटनेला प्रज्योतची निवड झाल्याचे पत्र पाठविले असून प्रज्योतने पासपोर्ट आणि ओळखपत्रासह २० जून रोजी दिल्ली येथे इतर अधिकाऱ्यांसोबत सहभागी व्हावे, असे यात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एक पंच आणि अधिकारी म्हणून त्याची दुसºयांदा निवड झाली आहे. यापूर्वी, २०१६ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत त्याने अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर प्रो कबड्डी स्पर्धेत त्याने सलगपणे आॅफिसियल म्हणून काम पाहिले आहे. त्याचा अनुभव आणि कामातील कौशल्य याचा विचार करताना कबड्डी फेडरेशनने त्याची ही निवड केली आहे. या निवडीबद्दल प्रज्योतचे गोवा कबड्डी संघटनेच्या अध्यक्षा रुक्मिणी कामत आणि आश्रयदाते दत्ता कामत यांनी अभिनंदन केले आहे. प्रज्योतने गोवा कबड्डीला आंतरराष्ट्रीय मान मिळवून दिला आहे. तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची प्रतिक्रिया रुक्मिणी कामत यांनी व्यक्त केली.
कोट :
निवडीबद्दल कळल्यानंतर मी खूप आनंदी झालो. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा माझा दुसरा इव्हेंट आहे. मोठी जबाबदारी आहे. मी माझ्याकडून सर्वाेत्कृष्ट योगदान देण्याचा प्रयत्न करीन. गोवा कबड्डी संघटनेच्या अध्यक्षा रुक्मिणी कामत आणि अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन आॅफ इंडियायांचा मी खूप आभारी आहे.
स्पर्धेबाबत...
कबड्डी मास्टर्स ही ६ देशांची स्पर्धा आहे. ९ दिवसांच्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, रिपब्लिक कोरिया, इराण, अर्जेंटिना आणि केनिया यांचा समावेश आहे. दुबई हे आता विविध खेळांसाठीआकर्षणाचे केंद्र ठरत आहे. दुबई स्पोटर््स कौन्सिलच्या पुढाकाराने आता कबड्डीला प्रोत्साहन देण्याचे ठरवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे.