Action against suspension of Deepika Joseph, Snehal Shinde | दीपिका जोसेफ, स्नेहल शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई

दीपिका जोसेफ, स्नेहल शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई

मुंबई : राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत साखळी फेरीतच महाराष्ट्र संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर पाच महिन्यांनी या पराभवाची चौकशी झाली. या चौकशीनंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने संघाचे प्रशिक्षक श्रीराम भावसार, संघ व्यवस्थापिका मनिषा गावंड, कर्णधार सायली केरीपाळे, वरिष्ठ खेळाडू दीपिका जोसेफ आणि वरिष्ठ खेळाडू स्नेहल शिंदे यांच्यावर सोमवारी शिस्तपालन समितीने निलंबनाची कारवाई केली.
यंदा पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ५८ वर्षांनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या महिला संघावर साखळी फेरीत बाद होण्याची नामुष्की ओढावली. या पराभवाची चौकशी झाल्यानंतर देवराम भोईर यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने कठोर निर्णय घेतले. यानुसार संघाचे प्रशिक्षक श्रीराम भावसार यांच्या पाच वर्षे निलंबित करण्यात आले. संघ व्यवस्थापिका मनिषा गावंड यांनाही दोन वर्षे निलंबित करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, संघातील वरिष्ठ खेळाडू दीपिका जोसेफ हिच्यावर पाच वर्षे, तर अन्य वरिष्ठ खेळाडू स्नेहल शिंदे आणि संघाची कर्णधार सायली केरीपाळे यांच्यावर प्रत्येकी दोन वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या पराभवाची चौकशी करताना शिस्तपालन समितीने प्रत्येक खेळाडूंकडून लेखी प्रश्नपत्रिकांद्वारे उत्तरे घेतली. शिवाय प्रत्येक खेळाडूसह, प्रशिक्षक व व्यवस्थापिका यांना समितीसमोर आपले वैयक्तिक मत मांडण्यास सांगितले. या वेळी सुमारे दहा तास चौकशी प्रक्रीया पार पडल्याची माहिती, शिस्तपाल समितीचे सचिव मंगल पांडे यांच्याकडून मिळाली.
पाटणा येथील स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंनी प्रसारमाध्यमांकडे दिलेला सामूहिक अर्ज व त्यातील सर्व मुद्दे यावरही चौकशीदरम्यान चर्चा करण्यात आली. या सर्व गोष्टींची चौकशी झाल्यानंतर समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने निलंबनाच्या कारवाईचा निर्णय घेतला.

Web Title: Action against suspension of Deepika Joseph, Snehal Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.