दुबईत 3D प्रिंटिंगमधून जगातला पहिला व्हिला तयार; तंत्रज्ञानाच्या करामतीमुळे नवा अविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 08:20 IST2026-02-14T08:18:01+5:302026-02-14T08:20:14+5:30

या प्रकल्पात ‘काउच’ नावाच्या थ्री ॲक्सिस रोबोटिक आर्मचा वापर केला जात आहे. हा रोबोट संगणकावरून मिळालेल्या डेटाच्या आधारे थेट काँक्रीटचे थर रचून भिंती तयार करतो.

World first villa built through 3D printing in Dubai; New invention due to the miracle of technology | दुबईत 3D प्रिंटिंगमधून जगातला पहिला व्हिला तयार; तंत्रज्ञानाच्या करामतीमुळे नवा अविष्कार

दुबईत 3D प्रिंटिंगमधून जगातला पहिला व्हिला तयार; तंत्रज्ञानाच्या करामतीमुळे नवा अविष्कार

आपल्या तांत्रिक करामतींमुळे दुबई कायमच जगभरात चर्चेत असतं. आताही हे शहर अशाच एका कारणामुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. रोबोटिक थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुबईत आता जगातला पहिला लक्झरी व्हिला तयार केला जात आहे. तंत्रज्ञानाच्या या करामतीमुळे अख्ख्या जगानं तोंडात बोटं घातली आहेत!

दुबई वापरत असलेल्या या तंत्रज्ञानामुळे बांधकामातील माणसांचा वापर जवळपास नगण्य झाला आहे. माणसांच्या जागी रोबोट्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे ज्या कामाला सहा महिने लागू शकतात, ते आता फक्त दोन आठवड्यांत आणि तेही बिनचूक पद्धतीनं होणार आहे. ‘मिडिल ईस्ट कंपोजिट्स’ ही कंपनी या प्रकल्पाचं नेतृत्व करत आहे. हे तंत्रज्ञान दुबईच्या ‘थ्रीडी प्रिंटिंग स्ट्रॅटेजी २०३०’चा भाग आहे. या धोरणाचं उद्दिष्ट बांधकामासाठी लागणारा वेळ ८० टक्क्यांपर्यंत कमी करणं आहे.

या प्रकल्पात ‘काउच’ नावाच्या थ्री ॲक्सिस रोबोटिक आर्मचा वापर केला जात आहे. हा रोबोट संगणकावरून मिळालेल्या डेटाच्या आधारे थेट काँक्रीटचे थर रचून भिंती तयार करतो. हे मशीन ३६० अंशांमध्ये फिरून काम करू शकतं. यामध्ये खास प्रकारचं ‘प्रिंटिंग मॉर्टार’ म्हणजेच वेगानं सुकणारं काँक्रीट वापरलं जातं. या काँक्रीटच्या मदतीनं कोणत्याही अतिरिक्त आधाराशिवाय वक्र आणि गुंतागुंतीच्या भिंती उभारता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी वापरला जाणारा रोबोट सलग २४ तास काम करू शकतो.

डिजिटल मॅन्युफॅक्चरिंगच्या या तंत्रामुळे बांधकाम व्यवसायाची सगळी गणितंच बदलून टाकली आहेत. दुबईनं सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अतिशय वेगानं सुरू केला आहे. ‘थ्रीडी प्रिंटिंग स्ट्रॅटेजी २०३०’ या धोरणांतर्गत त्यांनी दुबईला जगाच्या नकाशात अव्वल स्थानी नेऊन ठेवायचा चंग बांधला आहे. २०१६ मध्येच त्यांनी आपली ही रणनीती जाहीर केली. उद्देश एकच, दुबईला जगातलं थ्रीडी प्रिंटिंग हब बनवायचं! या धोरणांतर्गत तीन मोठ्या क्षेत्रांवर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. बांधकाम, आरोग्य आणि उत्पादन व लॉजिस्टिक्स. बांधकाम क्षेत्रात २०३० पर्यंत दुबईत तयार होणाऱ्या किमान २५ टक्के इमारती थ्रीडी प्रिंटिंगमधून उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. त्यात घरं, ऑफिसेस, व्हिला, सरकारी इमारती, अगदी पादचारी पूलही थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.

आरोग्य क्षेत्रात थ्रीडी प्रिंटिंगचा उपयोग करून कृत्रिम अवयव, डेंटल इम्प्लांट्स, सर्जिकल उपकरणं तयार केली जात आहेत. यामुळे रुग्णाच्या शरीरानुसार खास डिझाइन केलेले अवयव बनविता येतात. थ्रीडी प्रिंटेड हाडं आणि टिश्यूवरही तिथे संशोधन सुरू आहे. उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही विमानांचे तसंच वाहनांचे सुटे भाग, औद्योगिक उपकरणं थ्रीडी प्रिंटिंगनं तयार केली जात आहेत. यामुळे जेव्हा आणि जिथे गरज पडेल त्यावेळी तिथल्या तिथे तो पार्ट तयार करता येतो.

‘एआय’आधारित ट्रॅफिक मॅनेजमेंटमुळे सिग्नल्स, कॅमेरे आणि डेटा वापरून दुबईनं आपल्याकडचं ट्रॅफिक जॅम लक्षणीयरीत्या कमी केलं आहे. ड्रोन टॅक्सी आणि ड्रोन डिलिव्हरीच्या माध्यमातून सेवा देणं सुरू केलं आहे. पर्यटन भागात रोबोट पोलिस तैनात केले आहेत. स्मार्ट कोर्ट आणि स्मार्ट पोलिस ठाण्यामध्ये २४ तास मानवरहित सेवा सुरू आहे.

Web Title : दुबई में 3डी प्रिंटिंग से बना दुनिया का पहला विला: तकनीकी चमत्कार

Web Summary : दुबई ने रोबोटिक तकनीक का उपयोग करके दुनिया का पहला 3डी-मुद्रित लक्जरी विला बनाया है। इससे निर्माण का समय काफी कम हो गया है, क्योंकि इसमें इंसानों की जगह रोबोट का इस्तेमाल किया जा रहा है। इस परियोजना का लक्ष्य निर्माण समय को 80% तक कम करना और दुबई को 3डी प्रिंटिंग हब के रूप में स्थापित करना है, जो निर्माण, स्वास्थ्य सेवा और विनिर्माण पर केंद्रित है।

Web Title : Dubai Unveils World's First 3D-Printed Villa: A Technological Marvel

Web Summary : Dubai has created the world's first 3D-printed luxury villa using robotic technology. This reduces construction time drastically, utilizing robots instead of humans. The project aims to cut construction time by 80% and establish Dubai as a 3D printing hub, focusing on construction, healthcare, and manufacturing.