काही नाती खरंच इतकी सुंदर असतात की, त्यांना शब्दात व्यक्त करणं कठीण होऊन बसतं. असंच काहीसं नातं आहे मॅलनी नॅक्ट आणि ट्रेवर हन या दोघांचं. या दोघांकडे पाहून आपल्याला असलेलं दु:खं फारच शुल्लक वाटतं आणि जगण्याची एक नवीन उमेद नक्कीच मिळते.
मॅलनी ही चालू शकत नाही. बालपणीच तिला स्पायना बिफिडा हा आजारा झाला होता. या आजारात पाठीचा कणाच विकसित होत नाही. त्यामुळे तिला व्हीलचेअरची मदत घ्यावी लागते. तर दुसरीकडे ट्रेवरने ग्लूकोमामुळे ५ वर्षांपूर्वीच डोळ्यांची दृष्टी गमावली. अशातही दोघांनी त्यांची हायकिंगची आवड पूर्ण केली आणि त्यांनी दाखवून दिलं की, इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही.
दोघांनी मिळून कोलोराडोच्या डोंगरात आणि रस्त्यांवर सैर केली. दोघांची अशी टिम आहे जी अनेकांसाठी उदाहरण ठरते. या दोघांची भेट अॅडेटीव्ह एक्सरसाइज क्लासेसमध्ये झाली होती. नंतर त्यांनी डोंगरावर ट्रेकिंग करायला जाण्याचा निर्णय घेतला.
मॅलनी याबाबत सांगते की, 'हा तर बस एक कॉमनसेन्स आहे. त्याच्याकडे पाय आहेत, तर माझ्याकडे डोळे. आणखी काय हवंय....आम्ही एकत्र कमाल टिम आहोत. अशात आमच्या दोघांकडेही कारण आणि जबाबदारी दोन्ही गोष्टी आहेत'. दोघांनाही फिरण्याची आवड आहे. अशा स्थितीतही दोघे सकारात्मकतेने लाइफ एन्जॉय करतात.
जेव्हा दोघे कोलेराडोच्या जंगलात फिरत होते तेव्हा मॅलनी ट्रेवरच्या पाठीवर बसली होती आणि त्याला पुढे चालण्यासाठी मार्गदर्शन करत होती. ती सांगते की, 'मी जे काही बघते ते सगळं ट्रेवरला सांगते. जेणेकरून तो योग्य दिशेने चालावा आणि त्यालाही अनुभव मिळावा'.
दोघांनुसार, 'सोबत फिरण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, आमच्या मोठमोठ्या अडचणी सोप्या होतात. ट्रेवर सांगतो की, डोंगरांवर कारने जाऊन तुम्हाला तो आनंद मिळत नाही, जो तुम्हाला पायी जाण्याने मिळतो. खरंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे, अडचणींमुळे अनेकजण आयुष्याला, जगण्याला कमी लेखतात. त्यांच्यासाठी या दोघांचं उदाहरण नवी उमेद देणारं नक्कीच आहे.