Amazon डिलेव्हरी बॉयकडे महिलेने केली विचित्र मागणी, सोशल मीडियावर रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 19:04 IST2021-08-28T19:00:23+5:302021-08-28T19:04:02+5:30
एका महिलेचा कारनामा समोर आला आहे. एका महिलेने Amazon वर विचित्र विनंती केली. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Amazon डिलेव्हरी बॉयकडे महिलेने केली विचित्र मागणी, सोशल मीडियावर रंगली चर्चा
कोरोना काळात ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. आवश्यक वस्तूंसोबतच इतरही वस्तू लोक ऑनलाईनच खरेदी करतात. Amazon सारख्या वेबसाईटवर ग्राहकांसाठी सामानाच्या डिलिव्हरीसाठी काही सूचना देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण काही लोक याचा वेगळाच फायदा घेताना दिसतात. अशाच एका महिलेचा कारनामा समोर आला आहे. एका महिलेने Amazon वर विचित्र विनंती केली. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
टिकटॉकवर एका महिलेने एका व्हिडीओतून आपला एक विचित्र अनुभव शेअर केला आहे. जगभरातील अनेक लोकांप्रमाणेच ही महिला कोळ्याला घाबरत होती. या महिलेच्या घराच्या मुख्य दारासमोर कोळ्याने जाळं तयार केलं होतं. त्यामुळे ती घरातून बाहेर यायला घाबरत होती. अशात Gwen Sanchez नावाच्या महिलेने फारच विचित्र प्रकार केला. (हे पण वाचा : यात कॅलक्यूलेटर पण नाहीए; हार्दिक पांड्याच्या ५ कोटींच्या घड्याळात चाहत्यांनी काढल्या उणीवा)
कोणत्याही ऑनलाइन सामानाची ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी बॉयसाठी काही खास सूचना दिल्या जाऊ शकतात. तुम्ही त्याला सांगू शकता की, सामान कोणत्या वेळेत आणायचं आणि कुठे ठेवायचं. अशाच महिलेने रिक्वेस्ट बॉक्समध्ये लिहिलं की, 'पॅकेज गॅरेजसमोरील कचऱ्याच्या डब्यासमोर ठेवून द्या. घराच्या दारासमोर एक मोठा कोळी आहे. जर तुम्ही त्याला मारलं तर खूप बरं होईल. कोळीच्या भीतीमुळे मी घराबाहेर पडू शकत नाहीये'.
डिलिव्हरी बॉयने सुद्धा महिलेची अडचण लक्षात घेत आपल्या शूजने कोळ्याला मारलं. टिकटॉकवर ही घटना शेअर झाल्यानंतर खूप व्हायरल होत आहे. लोक महिलेला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका ग्राहकाकडून करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात वेगळी सूचना असल्याने लोक याबाबत चर्चा करत आहे.