प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:17 IST2025-09-03T18:15:43+5:302025-09-03T18:17:32+5:30
पदोन्नती नाकारल्यानंतर अनेकजण निराश होतात. पण, एका महिलेने याचा असा काही बदला घेतला, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
दिवस-रात्र एक करून काम करणारा नोकरदार वर्ग एकाच गोष्टीची आतुरतेने वाट बघत असतो, ते म्हणजे पदोन्नती आणि पगारवाढ. अशावेळी पदोन्नती नाकारल्यानंतर अनेकजण निराश होतात. पण, एका महिलेने याचा असा काही बदला घेतला, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. बॉसने पदोन्नती नाकारल्यानंतर या महिलेने थेट कंपनीच विकत घेतली आणि ज्या बॉसने कधी तिला सीईओ बनवण्यास नकार दिला होता, त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवून धडा शिकवला.
बॉसला धडा शिकवणारी ही महिला अमेरिकेतील व्यावसायिक ज्युलिया स्टीवर्ट आहे. एकेकाळी त्या 'Applebee's' या कंपनीच्या अध्यक्ष होती. त्यावेळी त्यांना वचन देण्यात आले होते की, जर त्यांनी कंपनीचा नफा वाढवला, तर त्यांना सीईओ बनवले जाईल. यानंतर, ज्युलियाने एक टीम तयार केली आणि रात्रंदिवस मेहनत करून तीन वर्षांत कंपनीला तोट्यातून फायद्यात आणले.
बॉसने वचन मोडले!
मात्र, कंपनीने जेव्हा वचन पूर्ण करण्याची वेळ आली, तेव्हा ज्युलियाच्या बॉसने तिला दिलेले वचन मोडले आणि त्यांना पदोन्नती देण्यास साफ नकार दिला. ज्युलियाने याचे कारण विचारले असता, त्यांना कोणतेही उत्तर दिले गेले नाही. या फसवणुकीमुळे निराश होऊन ज्युलिया यांनी 'Applebee's'मधून राजीनामा दिला.
कंपनी सोडल्यानंतर ज्युलियाने 'इंटरनॅशनल हाऊस ऑफ पॅनकेक' (IHOP) कंपनीत काम करायला सुरुवात केली. येथे त्यांनी पाच वर्षे काम केले आणि कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवले. जेव्हा IHOPचे संचालक मंडळ नवीन कंपनी खरेदी करण्याचा विचार करत होते, तेव्हा ज्युलियाने त्यांना आपली जुनी कंपनी 'Applebee's' खरेदी करण्याचा सल्ला दिला.
आणि झाल्या जुन्या कंपनीच्या बॉस!
सर्वांनी ज्युलियाच्या सल्ल्यावर सहमती दर्शवली. त्यानंतर 'Applebee's' कंपनीला २.३ बिलियन डॉलर्समध्ये (म्हणजे सुमारे २०,२४३ कोटी रुपये) खरेदी करण्यात आले. अशा प्रकारे ज्युलिया पुन्हा आपल्या जुन्या कंपनीच्या बॉस बनल्या.
पहिल्याच दिवशी बॉसला शिकवला धडा!
आपल्या जुन्या कंपनीच्या बॉस बनल्यानंतर ज्युलियाने सर्वात आधी त्यांनी जुन्या बॉसला म्हणजेच सीईओला बाहेरचा रस्ता दाखवला, ज्याने कधीतरी खोटे वचन देऊन त्यांची फसवणूक केली होती. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये ज्युलिया यांनी ही गोष्ट सांगितली, जी आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांची ही कहाणी अनेकांना प्रेरणा देत आहे.