अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:15 IST2025-10-22T16:14:45+5:302025-10-22T16:15:08+5:30
हा देश ना स्वतःचे चलन छापतो, ना त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तरीही त्याची यशोगाथा अद्भुत आहे.

अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
एखाद्या देशाचे यश किंवा ताकद मोजायची झाल्यास आपण सहसा सैन्यशक्ती, भूभागाचा विस्तार किंवा आर्थिक स्वातंत्र्य या निकषांचा विचार करतो. मात्र, युरोपमधील लिकटेंस्टीन या छोट्याशा देशाने ही पारंपरिक विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकली आहे. हा देश केवळ मर्यादित संसाधनांवरही समृद्ध नाही, तर जगातील सर्वात स्थिर आणि सर्वाधिक प्रति-व्यक्ती उत्पन्न असलेला देश म्हणून ओळखला जातो.
हा देश ना स्वतःचे चलन छापतो, ना त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तरीही त्याची यशोगाथा अद्भुत आहे. लिकटेंस्टीनच्या यशाचे रहस्य सर्वकाही निर्माण करण्यात नसून, जे काही आहे त्याचा सर्वोत्तम उपयोग करण्यात दडलेले आहे.
शेजाऱ्याची करन्सी वापरुन खर्च वाचवला!
बहुतांश देश आपली सार्वभौमत्वाची चिन्हे म्हणून चलन, भाषा आणि राष्ट्रीय एअरलाईन जपतात. पण लिकटेंस्टीनने याच्या अगदी उलट मार्ग निवडला. त्याने शेजारील स्वित्झर्लंडकडे पाहिले आणि एक अत्यंत व्यावहारिक निर्णय घेतला. एखादी गोष्ट जर शेजाऱ्याकडून उधार घेऊन उत्तम प्रकारे चालवता येत असेल, तर स्वतःवर खर्च कशासाठी करायचा? असा विचार त्यांनी केला.
या देशाने स्वतःचे चलन बनवण्याऐवजी स्विस फ्रँक हे चलन स्वीकारले. यामुळे त्यांना मजबूत आणि स्थिर आर्थिक संरचना मिळाली. यामुळे त्यांना महागड्या केंद्रीय बँकेची गरज भासली नाही आणि चलन व्यवस्थापनाचा खर्चही वाचला.
विमानतळही नाही!
अरबो डॉलर्स खर्चून विमानतळ बांधण्याऐवजी, लिकटेंस्टीनने स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियाच्या वाहतूक नेटवर्कचा वापर केला आणि अब्जावधी डॉलर्सची बचत केली.
उद्योग आणि नवकल्पना हीच खरी ताकद
लिकटेंस्टीनचे नाव ऐकताच अनेकांना गुप्त बँक खात्यांची प्रतिमा डोळ्यासमोर येते. पण या देशाची खरी ताकद उद्योग आणि नवकल्पनामध्ये आहे. हा देश प्रेसिजन इंजिनियरिंगमध्ये जगात अग्रगण्य आहे. दातांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्म ड्रिलपासून ते अंतराळ तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल पार्ट्सपर्यंत अनेक गोष्टी येथे बनवल्या जातात.
जागतिक कंपन्यांचे प्रतीक
बांधकाम उपकरणांमध्ये जागतिक नेता असलेली Hilti ही कंपनी याच देशातून उदयास आली. हे लिकटेंस्टीनच्या औद्योगिक सामर्थ्याचे सर्वात मोठे प्रतीक आहे. या देशात कंपन्यांची संख्या लोकसंख्येपेक्षा जास्त नोंदणीकृत आहे. याचा परिणाम म्हणून, येथे बेरोजगारी जवळजवळ शून्य आहे आणि नागरिकांचे उत्पन्न सातत्याने वाढत आहे.
कर्जमुक्त देश आणि गुन्हेगारी-मुक्त समाज
लिकटेंस्टीन केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत स्थिर आहे. या देशावर जवळपास शून्य कर्ज आहे आणि येथील सरकार नेहमी महसूल अधिशेष चालवते. सर्वात महत्त्वाचे आणि मनोरंजक तथ्य म्हणजे, संपूर्ण देशात फारच कमी कैदी आहेत. येथील नागरिकांमध्ये इतका विश्वास आहे की, ते रात्री आपल्या घरांचे दरवाजे बंद करत नाहीत.