सौदीमध्ये भारतीय किंवा पाकिस्तानी लोकांना म्हणतात 'रफीक', पाहा काय आहे यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:53 IST2025-12-15T15:52:42+5:302025-12-15T15:53:40+5:30
Interesting Facts : सौदी अरेबिया आणि इतर खाडी देशांमध्ये भारतीय, पाकिस्तानी यांसारख्या दक्षिण आशियाई प्रवाशांना कधी कधी “रफीक़” या शब्दाने संबोधलं जातं.

सौदीमध्ये भारतीय किंवा पाकिस्तानी लोकांना म्हणतात 'रफीक', पाहा काय आहे यामागचं कारण
भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमधील लोक दरवर्षी रोजगारासाठी सौदी अरेबियात जातात. या देशांच्या तुलनेत खाडी देशांमध्ये पगार जास्त असल्यामुळे अनेक जण घर-परिवारापासून दूर राहून वर्षानुवर्षे तिथे काम करतात आणि पैसे कमावून मायदेशी परततात. पण तुम्हाला माहिती आहे का की भारत-पाकिस्तानातून गेलेल्या लोकांना सौदी अरेबियात काय म्हटलं जातं?
सौदी अरेबिया आणि इतर खाडी देशांमध्ये भारतीय, पाकिस्तानी यांसारख्या दक्षिण आशियाई प्रवाशांना कधी कधी “रफीक़” या शब्दाने संबोधलं जातं. मग या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Quoraवर प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यावर वेगवेगळी मतं मांडली गेली आहेत.
“रफीक़” या शब्दाचा अर्थ काय?
सौदी अरेबियातील सबाकाह भागात काम करणारे बाबर मुगल सांगतात की त्यांचा जन्म आणि बालपण 1980 च्या दशकात जेद्दामध्ये झालं. त्या काळात रस्त्यांवर “रफीक़” हा शब्द खूप ऐकू यायचा. अरबी भाषेत “रफीक़”चा शाब्दिक अर्थ “साथी” किंवा “सोबती” असा होतो. मात्र 1980 आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला हा शब्द भारतीय उपखंडातील कामगारांसाठी एक प्रकारचा स्लँग (अपमानास्पद शब्द) म्हणून वापरला जाऊ लागला.
मुगल यांच्या मते, त्या काळात याची तुलना “एन-वर्ड”सारख्या अपमानजनक शब्दाशी केली जायची आणि अनेक भारतीय, पाकिस्तानी व बांगलादेशी लोकांना हा शब्द अजिबात आवडत नव्हता.
पण गेल्या पाच वर्षांत शिक्षणाचा स्तर वाढल्यामुळे आणि समाजाची मानसिकता बदलल्यामुळे हा शब्द सार्वजनिक वापरातून हळूहळू कमी होत आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
तारिक बेद्दा यांच्या मते, अरबी संस्कृतीत एखाद्या अनोळखी व्यक्तीला थेट “तू” किंवा “ए” असं संबोधणं असभ्य मानलं जातं. त्यामुळे आदर दाखवण्यासाठी “रफीक़” (मित्र/दोस्त) यांसारख्या शब्दांचा वापर केला जातो. त्यांच्या मते, 'रफीक़' या शब्दाचा कोणताही भेदभावपूर्ण अर्थ नाही, तो फक्त “मित्र” किंवा “साथी” या अर्थाने वापरला जातो.
शाहिद सुमरा यांनीही “रफीक़”चा अर्थ “दोस्त” असाच असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, हा शब्द फक्त भारतीय किंवा पाकिस्तानी लोकांसाठीच नाही, तर अरबांसह सर्वांसाठी वापरला जातो. जसं भारतात आपण “भाऊ” किंवा “भाईसाहेब” म्हणतो.
यासिर अल यांच्या मते, सध्या सौदी अरेबियात कोणत्याही गैर-अरब प्रवाशाला विशेषतः भारतीय, बांगलादेशी आणि पाकिस्तानी लोकांना “सदीक (Sadeeq)” म्हणजेच दोस्त असं म्हणणं अधिक सामान्य झालं आहे.
एकूण पाहता, “रफीक़” हा शब्द मूळात सकारात्मक अर्थाचा असला तरी, काळानुसार आणि वापरानुसार त्याची छटा बदलत गेली. आज मात्र शिक्षण, जागरूकता आणि बदलत्या सामाजिक दृष्टिकोनामुळे अधिक सन्मानजनक शब्दांचा वापर वाढताना दिसतो.